कल्याण : रेल्वे स्थानक परिसरात बस स्टँडसमोर असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्कायवॉकला दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेत स्कायवॉकखाली असलेल्या दोन वाहनांचे नुकसान झाले, तर तीन जण जखमी झाले. आग शॉर्टसर्किटने लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.
हा स्कायवॉक रेल्वे स्थानकनजीक असल्याने नागरिकांची सदैव वर्दळ असते. स्कायवॉकला आग लागताच नागरिकांची एकच धावपळ उडाली. तत्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. परंतु, वाहतूककोंडीमुळे अग्निशमन दलाची गाडी उशिराने घटनास्थळी पोहोचली.
स्कायवॉकखाली उभ्या असलेल्या दोन टॅक्सींचे नुकसान झाले. यात इम्तियाज शेख, अमन सुतार आणि अन्वर सुतार या तिघा टॅक्सीचालकांना डोक्याला आणि हाताला दुखापत झाली आहे. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे एमएफसी पोलिसांनी सांगितले.