Join us

स्कायवॉकवर स्त्री अर्भकास फेकले

By admin | Updated: August 25, 2015 02:46 IST

सरकारद्वारे स्त्रीभ्रूणहत्येविरोधी आणि मुलींसाठी विविध योजनांची खैरात केली असली तरी आजही समाजात मुलगी जन्मल्याचा तिरस्कार या ना त्या प्रकारे व्यक्त होत असतो.

ठाणे : सरकारद्वारे स्त्रीभ्रूणहत्येविरोधी आणि मुलींसाठी विविध योजनांची खैरात केली असली तरी आजही समाजात मुलगी जन्मल्याचा तिरस्कार या ना त्या प्रकारे व्यक्त होत असतो. ठाण्यात तर एका मातेनेच आपल्या पोटच्या गोळ्याला चक्क स्कायवॉकवर बेवारस स्थितीत फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. हे अर्भक अवघ्या १५ ते २० दिवसांचे असून एका दक्ष रिक्षाचालकामुळे या मुलीला जीवदान मिळाले आहे. ठाणे पूर्वेकडील रेल्वे स्थानकाला जोडलेल्या स्कायवॉकच्या कोपरी बस डेपोकडील जिन्याच्या वरच्या बाजूला रविवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास टॉवेलात गुंडाळून चिमुकल्या मुलीला बेवारस स्थितीत फेकण्यात आले. आपली रिक्षा बंद करून घरी परतण्याच्या तयारीत असलेले श्री पवनसुत सेवा प्रतिष्ठानचे सेवेकरी दत्तात्रेय जोईल यांना अचानक रडण्याचा आवाज आल्याने त्यांनी स्कायवॉकवर धाव घेत चिमुकलीला कवटाळून तिच्याजवळच पडलेल्या पिशवीतील दुधाच्या बाटलीतील दूध पाजले. त्यानंतर, स्थानिकांना बोलवून कोपरी पोलिसांशी संपर्क साधून तीला शासकीय रुग्णालयात हलवले. सध्या बाळ सुखरूप असून पोलीस तिला निर्दयपणे फेकून देणाऱ्या मातापित्याचा शोध घेत आहेत. प्रत्यक्ष घटनास्थळी पिशवीत पौष्टिक सेरेलॅक पावडर, महागडे डायपर आणि दुधाची बाटली आढळली आहे. त्यामुळे, हे बाळ चांगल्या घरातील असावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.