Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत आकाश निरभ्र; विदर्भात पाऊस पडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:59 IST

किमान तापमानात झालेली घट, बाष्पात झालेली वाढ आणि धुळीकणांची पसरलेली चादर या प्रमुख कारणांमुळे मुंबई प्रदूषकांच्या वेढ्यात ओढली गेली होती. मात्र आता बाष्प हटले असून, किमान तापमानातही वाढ झाली आहे.

मुंबई : किमान तापमानात झालेली घट, बाष्पात झालेली वाढ आणि धुळीकणांची पसरलेली चादर या प्रमुख कारणांमुळे मुंबई प्रदूषकांच्या वेढ्यात ओढली गेली होती. मात्र आता बाष्प हटले असून, किमान तापमानातही वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे धुळीकणांचे प्रमाणही कमी झाले आहे. परिणामी मुंबईचे आकाश निरभ्र झाले आहे. तर दुसरीकडे मुंबई वगळता उर्वरित राज्यात गारपिटीसह पाऊस सुरू आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीचा जोर सुरू असतानाच मंगळवारी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. १३ फेब्रुवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहील. १४, १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. मंगळवारसह बुधवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, १७ अंशाच्या आसपास राहील; शिवाय आकाश मुख्यत: निरभ्र राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

टॅग्स :मुंबई