मुंबई: अॅन्टॉप हिलमध्ये घडलेल्या पाच वर्षांच्या चिमुरडीवरील बलात्कार प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीचे रेखाचित्र तयार केले आहे. तसेच संशयाच्या बळावर सुमारे २५ जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.२१ एप्रिलला आईच्या सांगण्यावरून दुकानात आलेल्या या चिमुरडीचे आमिष दाखवून अपहरण केले. त्यानंतर रात्री बाराच्या सुमारास ही चिमुरडी जखमी अवस्थेत अॅन्टॉप हिलच्या निर्जन परिसरात आढळली. तिला त्या अवस्थेत पाहणाऱ्यांनी तत्काळ नियंत्रण कक्षाला फोन फिरवला. त्यानुसार अॅन्टॉप हिल व वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्याचे अधिकारी तेथे आले. मात्र मुलीला वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याआधी, पंचनामा करण्याआधी, महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याआधी पोलिसांनी हद्दीचा वाद घातला. या वादात सुमारे एक ते दोन तास ही चिमुरडी तिथेच विव्हळत होती. अखेर ही बाब स्थानिक रहिवाशांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगितली. त्यानंतर वाद घालणारे पोलीस भानावर आले आणि मुलीला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढे हा गुन्हा अॅन्टॉप हिल पोलीस ठाण्यात नोंद झाला. पुढील तपासासाठी वडाळा टीटी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. हद्दीचा वाद घालणाऱ्या अॅण्टॉप हिल पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निंबाळकर आणि वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार आनंद झावरे या दोघांना निलंबित करण्यात आले. (प्रतिनिधी)