Join us

सहा वर्षांच्या मुलाला डॉक्टरकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 06:26 IST

अर्धांगवायूचा त्रास होत असल्याने सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल झालेल्या ६ वर्षीय सूर्यांशू गुप्ता या मुलाला एका डॉक्टरने टॉर्चने मारल्याची घटना रविवारी घडली.

मुंबई : अर्धांगवायूचा त्रास होत असल्याने सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल झालेल्या ६ वर्षीय सूर्यांशू गुप्ता या मुलाला एका डॉक्टरने टॉर्चने मारल्याची घटना रविवारी घडली. रात्री बारा वाजल्यानंतर डोळे तपासण्यासाठी बोलाविल्याचा राग काढत डॉक्टरने त्या चिमुरड्याच्या डोक्याला टॉर्चने मारल्याचा आरोप गुप्ता कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळे जखम होऊन त्या मुलाला तीन टाके पडले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.विक्रोळी येथे स्थायिक असणाऱ्या मुकेशकुमार गुप्ता यांच्या मुलाचे हात-पाय अचानक थरथरू लागले. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाला दाखल केल्यानंतर डोळे तपासताना डॉ. गौरव याने ही टॉर्च मारल्याचे गुप्ता यांनी सांगितले. ही घटना रुग्णालयाच्या अभ्यागत समितीचे सदस्य आणि माहिती अधिकार कार्यकर्ते संजय गुरव यांनी सोमवारी उघडकीस आणली. एम.आर.ए मार्ग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे, मात्र कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.