Join us

दहा लाखांसाठी सहा वर्षांच्या मुलीचे अपहरण

By admin | Updated: May 29, 2017 06:49 IST

दहा लाखांच्या खंडणीसाठी एका नोकराने मालकाच्याच मुलीचे अपहरण केल्याची घटना शनिवारी ट्रॉम्बे परिसरात घडली.

मुंबई : दहा लाखांच्या खंडणीसाठी एका नोकराने मालकाच्याच मुलीचे अपहरण केल्याची घटना शनिवारी ट्रॉम्बे परिसरात घडली. दरम्यान, पोलीस आपला शोध घेत असल्याची माहिती मिळताच त्याने या मुलीला धारावी परिसरात सोडून पळ काढला.चित्ता कॅम्प परिसरात मोहम्मद इक्लाक शेख हे पत्नी आणि त्याच्या सहा वर्षीय मुलीसह राहत असून त्यांचा धारावीत कपडे तयार करण्याचा व्यवसाय आहे. शनिवारी सकाळी त्यांची सहा वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत असताना बेपत्ता झाली. मुलीची आई नुरमुजहत हिने बराच वेळ मुलीचा शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. त्यामुळे तिने ही बाब पतीला सांगितल्यानंतर त्यांनी तत्काळ ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली.त्यानुसार पोलीस या मुलीचा आणि अपहरणकर्त्याचा शोध घेत असतानाच रात्री अपहरणकर्त्याने शेख यांना फोन करून दहा लाखांची खंडणी मागितली. मात्र पोलीस आपला शोध घेत असल्याचे या आरोपीला समजताच त्याने रविवारी सकाळी या मुलीला तिच्या वडिलांचा कारखाना असलेल्या धारावीतील मुकुंद नगर परिसरात सोडून पळ काढला. तिच्या वडिलांनी ही बाब तत्काळ ट्रॉम्बे पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी मुलीकडे विचारपूस केली असता, कारखान्यातीलच एक कर्मचारी तिला घेऊन गेल्याचे तिने पोलिसांना सांगितले. हा कर्मचारी या मुलीचा नातेवाईकदेखील असून सध्या तो फरार आहे. दरम्यान, पोलिसांनी एक पथक तयार करून या आरोपीचा शोध सुरू केला आहे.