वसई : विरारकडे येत असलेल्या लोकलमधील सहा प्रवाशांना चार जणांनी मीरा रोड ते नायगाव स्टेशनदरम्यान बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री ९च्या सुमारास घडली. नायगाव स्टेशन आल्यानंतर ते पसार झाले.पास्कोल रॉड्रीक्स, धमेंद्र भाऊसार, कमल शेख, शिवकुमार मिश्रा, मधुकर शिवराय मोहिते आणि हरिशंकर यादव या प्रवाशांना धावत्या लोकलमध्ये बेदम मारहाण करून जखमी करण्यात आले. हे सहाही प्रवासी विरार लोकलने घरी परतत होते. शुक्रवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास मीरा रोड स्टेशन आल्यानंतर चार अज्ञात इसम डब्यात चढले. त्यानंतर त्यांनी या सहाही जणांनी भांडण उकरून काढले. त्यानंतर आधीच तयारीने आलेल्या चौघांनी त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे चारही इसम सहा प्रवाशांना मीरा रोड ते नायगावदरम्यान किमान १५ मिनिटे मारहाण करीत होते. मात्र, डब्यातील एकही प्रवासी बचावासाठी पुढे आला नाही. या प्रकरणी वसई पोलिसांत अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
विरार लोकलमध्ये सहा प्रवाशांना मारहाण
By admin | Updated: October 1, 2016 01:38 IST