Join us

सहा महिन्यांत १८८ सोनसाखळी चोर गजाआड

By admin | Updated: July 16, 2015 22:37 IST

रस्त्यावरून पायी जाणाऱ्या महिलांना टार्गेट करत सोनसाखळी चोरांनी मुंबईत धुमाकूळ घातला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी सोनसाखळी चोरीच्या

मुंबई : रस्त्यावरून पायी जाणाऱ्या महिलांना टार्गेट करत सोनसाखळी चोरांनी मुंबईत धुमाकूळ घातला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी सोनसाखळी चोरीच्या घटनेत घट झाली असली, तरी सोनसाखळी चोरांची दहशत अद्याप कायम आहे. गेल्या सहा महिन्यांत मुंबई शहरात ४४५ सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल झाले. यापैकी १८८ सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.सोनसाखळी चोरांना आवर घालण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी ठिकठिकाणी चेन स्नॅचिंग पॉइंट ठरविले. या जागांवर गस्त वाढविली. तसेच मुंबईकरांमध्येही जनजागृती करण्यात येत आहे. महिला पोलीसही साध्या वेशात अंगावर दागिने घालून सोनसाखळी चोरांचा सुगावा घेण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर उतरल्या होत्या. पोलिसांच्या या कारवाईमुळे यंदाच्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली. गेल्या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांत ६७३ सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. पैकी अवघ्या २४४ घटनांची उकल करण्यास पोलिसांना यश आले. या वर्षी जून अखेरीस मुंबईत ४४५ गुन्हे दाखल झाले. पैकी १५१ गुन्हे उघडकीस आणण्यात आले. यामध्ये पूर्व, पश्चिम आणि उत्तर विभागात सोनसाखळी चोरीचे प्रमाण जास्त तर, दक्षिण भागात याचे प्रमाण कमी असल्याचे पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले. अवघ्या सहा महिन्यांत १८८ सोनसाखळी चोरांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. (प्रतिनिधी)