Join us
Daily Top 2Weekly Top 5

फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरुकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:06 IST

आरोग्य विभागाची जनजागृतीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई,: कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का, याच्या चाचणीसाठी घरातल्या ...

आरोग्य विभागाची जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई,: कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का, याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी आरोग्य विभागाने भर दिला असून त्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केले.

राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत डॉ. व्यास यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला सहा मिनिटे चालण्याच्या चाचणीबाबत अधिक जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यामुळे नागरिकांना रक्तातील ऑक्सिजनची लपलेली कमतरता लक्षात येईल जेणेकरून गरजू रुग्णाला वेळेवर रुग्णालयात दाखल करणे शक्य होईल, असे डॉ. व्यास यांनी सांगितले.

* चाचणी कोणी व कशी करावी?

ताप, सर्दी, खोकला अथवा कोरोनोची लक्षणे जाणवल्यास तसेच होम आयसोलेशनमध्ये असणारे रुग्ण ही चाचणी करू शकतात. त्यापूर्वी बोटाला पल्स ऑक्सिमीटर लावून ऑक्सिजनची नोंद करावी. त्यांनतर ऑक्सिमीटर तसाच बोटात ठेवून घरातल्या घरात सहा मिनिटे चालावे (पायऱ्यांवर चालू नये). यादरम्यान अतिवेगात किंवा हळूहळू चालू नये तर मध्यम चालावे. सहा मिनिटे चालून झाल्यानंतर पुन्हा ऑक्सिजनच्या पातळीची नोंद घ्यावी. जर ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले नाही तर तब्येत उत्तम असे समजावे. समजा ऑक्सिजन एक ते दोन टक्क्यांनी कमी होत असेल तर काळजी न करता दिवसातून पुन्हा दोन वेळा अशीच चाचणी करावी जेणेकरून काही बदल होतो का, ते लक्षात येईल.

*चाचणीचा निष्कर्ष

सहा मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजनची पातळी ९३ टक्क्यांपेक्षा कमी होत असेल, चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती त्यापेक्षा ३ टक्क्यांपेक्षा जास्त घट होत असेल किंवा सहा मिनिटे चालल्यानंतर दम, धाप लागल्यासारखे वाटत असेल तर त्या व्यक्तीला ऑक्सिजन अपुरा पडतो आहे, असे समजून त्याला रुग्णालयात दाखल करावे.

ज्यांना बसल्याजागीच धाप, दम लागतो त्यांनी ही चाचणी करू नये, ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती ६ मिनिटांऐवजी ३ मिनिटे चालून ही चाचणी करू शकतात.

..............................