Join us

ठाण्यात २५ बंदुकांसह सहा काश्मिरींना अटक

By admin | Updated: September 15, 2014 08:51 IST

ठाण्यातील घोडबंदर रोड येथे पोलिसांनी २५ सिंगल आणि डबल बोअरच्या बंदुका हस्तगत करून सहा जणांना अटक केली

ठाणे : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर होत नाही, तोच ठाण्यात शस्त्रांचे घबाड सापडले आहे. ठाण्यातील घोडबंदर रोड येथे ठाणे पोलिसांनी २५ सिंगल आणि डबल बोअरच्या बंदुका हस्तगत करून सहा जणांना अटक केली. हे सहा जण मूळ जम्मू-काश्मीरचे रहिवासी असून, ते सुरक्षा एजन्सीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. घोडबंदर रोडवरील कासारवडवली गावात मागील ४ ते ५ महिन्यांपासून राहणाऱ्या शफिक खान (२१), फजाईल खान (२०), माजिद खान (३०), मजझर खान (२५), अशपाक खान (३०) आणि मोहंमद शेख (२६) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ६ लाख ३५ हजारांच्या २५ बंदुका जप्त केल्या असून, त्यामध्ये एक डबल बोअरची तर २४ सिंगल बोअरच्या बंदुकांचा समावेश आहे. ते महाराष्ट्र रजपूत सिक्युरिटी सर्व्हिस येथे सुरक्षारक्षक तथा सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. हे सहा जण काश्मीरमधील पसार गुलजार खान यांच्या मदतीने ठाण्यात आले होते. त्यांच्या सिक्युरिटी एजन्सीत ते कामाला आहेत. त्यानुसार, गुलजारचा शोध सुरू आहे. ही शस्त्रे त्यांना कोणी दिली, त्यामागे त्यांचा काय उद्देश होता, अजून कुठे-कुठे शस्त्रे ठेवली आहेत का, या साऱ्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये कोणताही घातपात नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ठाणे, मुंबई तसेच काश्मीरमध्ये त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड तपासले जाणार असून, आहेत. त्यांच्यापैकी माजिदने घर भाड्याने घेतले होते. त्यांना रविवारी न्यायालयाने १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यांच्याविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार आणि मुंबई पोलीस अधिनियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त व्ही.बी. चंदनशिवे यांनी दिली. सापडलेल्या बंदुकांत काडतुसे नसली तरी त्या वापरात असून, त्यातून यापूर्वी फायरिंग झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. ती शस्त्रे तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून, नंतर त्याबाबत योग्य खुलासा होईल. तत्कालीन परिमंडळ पोलीस उपायुक्तांनी या परिसरात घडलेल्या बलात्कारानंतर तेथे येणाऱ्या परराज्यांतील मजुरांची स्थानिक पोलीस ठाण्यामार्फत नोंद ठेवण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यांची बदली झाल्याने आणि मध्यंतरी आलेल्या सणावारांमुळे याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले होते. मात्र, ही नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. (प्रतिनिधी)