Join us  

अहमदनगरातून पळालेल्या दोन महिलांसह सहा बांगलादेशींना अटक, आधारकार्ड, पॅनकार्डही मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 7:52 PM

बांगलादेशी नागरिकांविरोधात ठाणे पोलिसांची कारवाई सुरू आहे. त्यातच, आता अखेर सहा बांगलादेशी नागरिकांना पकडले आहे . तसेच ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते.

ठळक मुद्दे१७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीठाणे पोलिसांची कारवाई

ठाणे : अहमदनगर येथील रेस्क्यू होम येथून पळ काढलेल्या त्या दोन महिलांसह सहा बांगलादेशी नागरिकांना तसेच एका भारतीय महिलेला डोंबिवलीच्या ढोकलीगाव, आडिवली येथून ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि मानपाडा पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात शुक्र वारी अटक केली. यामध्ये बांगलादेशी तीन महिला आणि तीन पुरु षांचा समावेश आहे. यातील एक बांगलादेशी पुरुष हा एका शिपिंग कंपनीच्या जहाजावरील इंजीनचालक असून त्यांच्याकडे वेगवेगळ्या तीन जन्मतारखांचे पुरावे मिळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली.मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांगलादेशी नागरिक अनधिकृतरीत्या वास्तव्यास असून त्यामध्ये एका रेस्क्यू होममधून पळालेल्या दोन महिला असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. त्यानुसार, दौंडकर यांच्या पथकासह मानपाडा पोलिसांनी ढोकळीगाव, आडिवली येथे संयुक्तरीत्या छापा टाकला. त्यामध्ये एका भारतीय महिलेसह प्रत्येकी तीन बांगलादेशी पुरुष आणि महिला अशा सात जणांना अटक केली. त्यांची चौकशी केल्यावर यातील एका भारतीय महिलेसह एक बांगलादेशी महिला २० सप्टेंबर रोजी अहमदनगर येथील स्रेहालय येथून पळून आल्याचे पुढे आले. त्या दोघींची अहमदनगर येथील एमआयडीसी पोलिसांनी एका पिटा अ‍ॅक्टनुसार केलेल्या कारवाईतून सुटका केली होती. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची रवानगी स्रेहालय या रेस्क्यू होममध्ये करण्यात आली होती. याचदरम्यान, त्या दोघींसह अन्य दोघी अशा चौघींनी तेथून पलायन केले. त्यांच्याबाबत एमआयडीसी पोलिसांनी मिसिंगची तक्रार दाखल असल्याचे पुढे आले असून तेथील पोलिसांना त्यांच्याबाबत माहिती कळवल्याचे सूत्रांनी सांगितले.अटक केलेल्या सहा बांगलादेशींपैकी मोहम्मद शहाजान याच्याकडे वेगवेगळ्या जन्मतारखांचे तीन पुरावे मिळून आले आहेत. तसेच तो गेल्या अनेक वर्षांपासून एका शिपिंग कंपनीच्या जहाजावर इंजीनचालक असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांच्याकडे आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड तसेच शाळा सोडल्याचा दाखला मिळून आला असून त्या पुराव्याबाबत सत्यता पडताळणी करण्यात येणार आहे. दुसरा इमदादूल हा त्याचा भाऊ ठाणे जेलमध्ये असल्याने त्याला भेटण्यासाठी लपूनछपून भारतात आला होता. त्यासह अबूल इस्लाम यालाही अटक केली आहे. तसेच त्या अटक केलेल्या सहा बांगलादेशींसह एक भारतीय महिलेला न्यायालयाने १७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दौंडकर यांनी दिली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.........................

टॅग्स :ठाणेपोलिसपोलीस ठाणे