Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोन पिस्तुलांसह सहा आरोपी गजाआड

By admin | Updated: February 14, 2017 04:50 IST

महानगरपालिका निवडणुकांच्या काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी खबरदारी म्हणून सराईत गुन्हेगारांकडे मोर्चा

मुंबई : महानगरपालिका निवडणुकांच्या काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी खबरदारी म्हणून सराईत गुन्हेगारांकडे मोर्चा वळविला आहे. अशा प्रकारेच व्ही.पी. रोड पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई करत दोन पिस्तुलांसह सहा आरोपींना गजाआड केले आहे. पोलिसांनी या आरोपींजवळून २ पिस्तुलांसह ८ जिवंत काडतुसे, चॉपर, बटन चाकू, मिरचीपूड आणि चार मोबाइल जप्त केले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरगाव परिसरातील प. बा. मार्गावर गस्त घालत असलेल्या व्ही. पी. रोड पोलिसांनी येथील पाचवी फॉकलंड गल्लीमधील लक्ष्मी वाइन शॉपजवळ संशयित तौसिफ तारीक खान (२९) आणि सलमान जाफर शेख (२६) यांना ताब्यात घेतले. आरोपींच्या झडतीमध्ये पोलिसांना एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे सापडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली. तर नानूभाई देसाई रोडवर असलेल्या सुतारगल्ली नाका येथील एका व्यावसायिकाला काही दरोडेखोर लुटण्यासाठी येणार असल्याची माहिती व्ही. पी. रोड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला. यात चार जणांना पकडण्यात आले असून दोन आरोपी पसार झाले. मोहम्मद फारुख युसूफ खान उर्फ सिद्धांत (३१), मोहम्मद जिलानी ईसाक शहा उर्फ काशी (३६), आरीफ बशीर कुरेशी (२८) आणि मोहम्मद सलीम अन्वर आलम शेख (२१) अशी या आरोपींची नावे आहेत. या आरोपींजवळून पोलिसांनी एका पिस्तुलासह चार जिवंत काडतुसे, चॉपर, बटन चाकू आणि मिरचीपूड जप्त केली आहे. यातील काशी या आरोपीला नागपाडा पोलिसांनी तडीपार केले होते. त्याच्यासह अन्य अटक आरोपींविरुद्ध घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडे व्ही.पी. रोड पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)