Join us

अफगाणिस्तानची स्थिती कृष्णविवरासारखी - हेमंत महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:12 IST

मुंबई : अफगाणिस्तानात यापूर्वी अनेक महासत्तांनी ताबा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. आता तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा ...

मुंबई : अफगाणिस्तानात यापूर्वी अनेक महासत्तांनी ताबा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. आता तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला असून त्याचा एकंदर जागतिक स्तरावरही परिणाम झाला आहे. पूर्वीपासून अफगाणिस्तानातील ही स्थिती असून सुपरपॉवर अशा अमेरिकेलाही काहीच प्रगती न करता बाहेर पडावे लागले आहे. तेथील ही स्थिती लक्षात घेता अफगाणिस्तान हे एखाद्या कृष्णविवराप्रमाणे झाले आहे, असे मत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरचे मानद संचालक निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले आहे. रविवारी आयोजित केलेल्या ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते.

ते म्हणाले की अफगाणिस्तानला सागरी सीमा नाहीत. त्या देशाच्या सीमेचा विचार करता इराणची सीमा मोठी आहे. तसेच पाकिस्तानचीही सीमा मोठी आहे. त्याचप्रमाणे तुर्कमेनिस्तान, ताझिकीस्तान आणि चीन यांच्याही सीमा आहेत. अफगाणिस्तानातील हिंसाचार चीनमध्ये शिरायला नको असे चीनला वाटते. अफगाणिस्तानात ९० टक्के सुन्नी असून इराणमधील हजारांचे प्रमाण १६ टक्के आहे. तर ताजिकी २४ टक्के असून ४५ टक्के अफगाणी लोक हे पठाण वा पश्तुन आहेत. पाकिस्तानला वाटते की, त्यांना अफगाणिस्तानातील या स्थितीचा फायदा होईल. मुळात तालिबान ही पाकिस्तानची निर्मिती असल्याचे काहींचे म्हणणे आहे. मात्र, सध्याची एकंदर स्थिती पाहता अफगाणिस्तान पाकिस्तानला वापरत आहे की पाकिस्तान अफगाणिस्तानला वापरत आहे ते नेमके सांगता येत नाही.

पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात अफगाण निर्वासित जात असून दहशतवादी निर्माण करण्याचा शिक्का पाकिस्तानवर आहे. अशा स्थितीत पाकिस्तानवर दुहेरी दबाव आहे. तर तालिबानने अमेरिकेवर विजय मिळवला असला तरी देश चालवणे वेगळे आहे. त्यांना कायदेशीर उत्पन्न नसल्याने त्यांच्यादृष्टीने ते सोपे नाही.

तालिबानबाबत भारताने घाई न करता त्यांना काश्मिरात हस्तक्षेप करू नये असे सांगायला हवे आणि तसे घडल्यास विकासकामात अफगाणिस्तानला त्रास होणार नाही, असे स्पष्ट करणेही महत्त्वाचे आहे. दूरचा विचार करता अफगाणिस्तानच पाकिस्तानला उघडा पाडेल. इतकेच नव्हे तर पाकिस्तानचे तुकडे पडण्याची मोठी शक्यता असल्याचाही अंदाज यावेळी महाजन यांनी व्यक्त केला.