Join us

सव्वा लाख मुंबईकरांना रोजगार देणारे ‘सीप्झ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:09 IST

मुंबई : सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक एक्स्पोर्ट प्रोसेसिंग झोन अर्थात ‘सीप्झ’चे नूतनीकरण आणि पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारकडून सुमारे २०० कोटी रुपयांची तरतूद ...

मुंबई : सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक एक्स्पोर्ट प्रोसेसिंग झोन अर्थात ‘सीप्झ’चे नूतनीकरण आणि पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारकडून सुमारे २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याअंतर्गत सीप्झमध्ये नव्याने सहभागी होणाऱ्या कंपन्या, तसेच विद्यमान कंपन्यांच्या स्थलांतरणासाठी नवीन ठिकाणे तयार केली जाणार असून, त्यासाठी टप्प्याटप्प्याने योजना आखल्या जातील.

शिवाय सामायिक सेवा केंद्र उभारण्यासाठी आणखी ५० कोटी दिले जातील, अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी नुकतीच केली. पण सीप्झ काय आहे, त्याची वैशिष्ट्ये कोणती, मुंबई आणि मुंबईकरांना त्याचा फायदा होतो का, या आणि अशा अनेक बाबींचा सविस्तर आढावा.

...............

सीप्झ काय आहे?

- सीप्झ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक एक्स्पोर्ट प्रोसेसिंग झोनची स्थापना १ मे १९७३ रोजी केवळ इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्मिती आणि निर्यातीसाठी युनि-प्रॉडक्ट ‘ईपीझेड’ म्हणून करण्यात आली. केंद्र सरकारने १९८७-८८ च्या दरम्यान सीप्झमधून डायमंड आणि ज्वेलरीची निर्मिती- निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला.

- क्लिष्ट परवाने प्रक्रिया, विविध प्रकारची नियंत्रणे, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा अभाव आणि अस्थिर वित्तीय व्यवस्था यांमुळे निर्माण झालेल्या त्रुटी दूर करण्यासाठी, तसेच भारतात मोठ्या परकीय गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी एप्रिल २००० मध्ये विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) धोरण जाहीर करण्यात आले. सीप्झ हे तीन निर्यात प्रक्रिया क्षेत्रांपैकी एक होते जे १ नोव्हेंबर २००० पासून विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून रूपांतरित करण्यात आले.

.........

किती कामगार काम करतात?

सीप्झमध्ये सध्या ४१० हून अधिक कंपन्या आहेत. एका युनिटमध्ये सुमारे ३०० ते ४०० कामगार काम करतात. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या एक्स्पोर्टसाठी सुरू झालेला हा झोन आता डायमंड आणि ज्वेलरी झोन म्हणून ओळखला जातो. सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचेही काम चालते. ७० टक्के निर्यात अमेरिकेत आणि ३० टक्के युरोपात होते.

.....

वैशिष्ट्ये

- भारतातील पहिले निर्यातभिमुख क्षेत्र. २०२३ मध्ये सीप्झला ५० वर्षे पूर्ण होतील.

- अंधेरी पूर्वेला ११० एकर जागेत ही औद्योगिक वसाहत वसली आहे.

- त्यात १४९ हून अधिक गेम्स आणि ज्वेलरी उत्पादक युनिट आहेत.

- १०० हून अधिक सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादक युनिट.

- सव्वा लाखांहून अधिक मुंबईकरांना रोजगार देणारी संस्था.

........

नियंत्रण कोणाचे?

विकास आयुक्त, सीप्झ (सेझ) हे नियंत्रक असून, त्यांच्या अखत्यारीत महाराष्ट्र, गोवा ही राज्ये आणि दादरा- नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील विशेष आर्थिक क्षेत्रे (सेझ) येतात. शिवाय सर्व ‘सेझ’च्या नियंत्रणासाठी विभागीय विकास आयुक्तांचीही नेमणूक केली जाते.