Join us

सायन रुग्णालय अजूनही असुरक्षित

By admin | Updated: May 6, 2015 04:38 IST

सायन रुग्णालयावर असलेला रुग्णांचा अतिरिक्त भार आणि तटपुंजी सुरक्षा व्यवस्थेमुळे सायन रुग्णालय असुरक्षित आहे का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई : सायन रुग्णालयावर असलेला रुग्णांचा अतिरिक्त भार आणि तटपुंजी सुरक्षा व्यवस्थेमुळे सायन रुग्णालय असुरक्षित आहे का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. सोमवारी रात्री एका सफाई कामगाराला रुग्णाच्या नातेवाईकाने मारहाण केली. यानंतर ‘रुग्णालयाच्या बाहेर पड, मग दाखवतो’ अशी धमकी ही दिली. यामुळे मंगळवारी सकाळी काही वेळासाठी कामगारांनी रुग्णालयात काम बंद आंदोलन पुकारले होते. सुरक्षा देण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास वॉर्ड क्रमांक ६ मध्ये दाखल असलेल्या काशीनाथ कोळी (५६) या रुग्णाच्या नातेवाईकाने सफाई कामगार प्रदीप दिवाण गवारे (३०) याला मारहाण केली. काशिनाथ यांना ३ एप्रिलपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोळी यांचे नातेवाईक कल्पेश कोळी (२६) आणि भावेश कोळी (२८) या दोघांनी मारहाण केल्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. थोड्या वेळाने सफाई कामगर पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे कळल्यावर त्या दोघांनी सफाई कामगाराची माफी मागितली. चुकून झाले, परत असे होणार नाही, असे सांगितले. मात्र रात्री दीडच्या सुमारास ‘रुग्णालयाबाहेर भेट, मग बघू’ अशी धमकी सफाई कामगाराला दिली असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली. सफाई कामगाराला सोमवारी रात्री झालेली मारहाण आणि धमकीच्या निषेधार्त मंगळवारी सकाळी कामगारांनी काम बंद आंदोलन केले. सकाळी नऊच्या सुमारास कामगार अधिष्ठाता कार्यालयाजवळ जमले होते. रुग्णालय प्रशासनाने त्या सफाई कामगाराला सुरक्षा देऊन सुरक्षेचे आश्वासन दिल्यावर कामगारांनी काम बंद आंदोलन मागे घेतले. सफाई कामगाराने रुग्णाच्या नातेवाइकांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सायन रुग्णालयात मंगळवारी १ वाजल्यापासून ४० बाउन्सर तैनात करण्यात आले आहेत. रुग्णालयात तीन वेळा पेट्रोलिंग केले जाणार आहे. २६ मार्च : एका परिचारिकेला रुग्णाच्या नातेवाइकाने धक्काबुक्की केली़ २८ मार्च : एका आया बाईला रुग्णाच्या नातेवाइकाने शिवीगाळ, धक्काबुक्की केली़२० एप्रिल : कान- नाक - घसा विभागातील २ डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाइकाने शिवीगाळ केली काशीनाथ कोळी (५६) या रुग्णाच्या नातेवाइकाने सफाई कामगर प्रदीप दिवाण गवारे (३०) याला मारहाण केली. त्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर त्यांनी त्याला धमकीही दिली.