Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘संगीतातला साधेपणा गाण्यांना अजरामर करतो’

By admin | Updated: June 6, 2015 22:43 IST

सध्याचे जग स्मार्ट होत चालले आहे. आपण सगळेच खूप हुशार झालो आहोत. त्यामुळे अधिक हुशारी दाखवण्याची चढाओढ सध्या सुरू आहे.

ाुंबई : ‘सध्याचे जग स्मार्ट होत चालले आहे. आपण सगळेच खूप हुशार झालो आहोत. त्यामुळे अधिक हुशारी दाखवण्याची चढाओढ सध्या सुरू आहे. त्याचा प्रत्यय कलेतही येतो आणि कविता, संगीतातही तो दिसतो. त्यामुळे एकंदरच साधेपणा, गोडवा लोप पावला आहे. पूर्वी संगीतकारांना स्वत:च्या संगीत रचना लोकांना आवडतील यावर प्रचंड विश्वास होता. ‘सिम्पलीसिटी आॅफ नोट्स’ त्यात होती. त्यामुळे ती गाणी आजही गुणगुणली जातात. संगीतातला हा साधेपणा आणि गोडवा त्या गाण्यांना अजरामर करतो आणि हेच एन. दत्तांच्या संगीताचे वैशिष्ट्य होते’, असे उद्गार ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी काढले. सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि एन. दत्ता मेमोरियल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कितना हसीं है जहॉँ’ या विशेष सांगीतिक आदरांजली कार्यक्रमात ते बोलत होते.कमीत कमी प्रयोग करत रागदारीत संगीत बांधणे ही कला त्यांना सिद्धहस्त होती. आज या महान संगीतकाराला जर श्रद्धांजली द्यायची असेल तर संगीत क्षेत्रातल्या मंडळींनी थोडा स्मार्टनेस कमी करून एन. दत्तांची कला आत्मसात करावी. नवे गाणे सहा दिवसांत विसरले जाण्याऐवजी ते आयुष्यभर रसिकांची साथ देईल, असा सल्ला त्यांनी या वेळी युवा संगीतकारांना दिला.‘माझ्या संगीत कारकिर्दीच्या सुरुवातीपासून एस.डी. बर्मनचा साहाय्यक ते स्वतंत्र संगीत दिग्दर्शक हा त्याचा प्रवास आम्ही एकत्रच केला. आज जेव्हा मी मागे वळून बघते, तेव्हा एक लक्षात येते की त्याची सगळीच गाणी अजरामर झाली. सगळीच सुंदर गाणी त्याने दिली. त्या तुलनेत त्याला इंडस्ट्रीमध्ये जो मान मिळायला हवा होता तो मिळाला नाही कारण तो सरळ होता. फिल्मी दुनियेत सरळ असून चालत नाही. अशी गुणवान माणसे इंडस्ट्रीत सरळपणे येतात आणि सरळपणे जातात. त्यांचा आवाज होत नाही. पण महत्त्वाचे म्हणजे त्याची गाणी आजही गुणगुणली जातात. हे अजरामरत्व कोणीही त्याच्यापासून हिरावू शकत नाही’, असे भावविवश उद्गार आशा भोसले यांनी एव्हीच्या माध्यमातून एन. दत्तांच्या आठवणी जागवताना काढले.‘रॉक अ‍ॅण्ड रोलसारखा वेगळा संगीतप्रकार एन.दत्ताने सहजपणे भारतीय संगीतात रुजवला. त्याच्याकडे मी गायलेली सगळी गाणी लोकप्रिय ठरली. त्याची आणि साहिर लुधियानवीची जोडी हे खास यशस्वी समीकरण होते. एन.दत्ता या नावाशिवाय चित्रपट संगीताचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही’, असे गौरवोद्गार लता मंगेशकर यांनी खास व्हिडीओच्या माध्यामातून काढले. ‘चित्रपट संगीत क्षेत्रात मोठे झालेल्या अनेकांना पहिली संधी एन.दत्तांनी दिली. त्यांच्यामुळेच आज आपण इथे आहोत’, अशी कृतज्ञता या वेळी ज्येष्ठ संगीत संयोजक अमर हळदीपूर आणि संगीतकार अशोक पत्की यांनी व्यक्त केली.रवींद्र जैन, खय्याम, कल्याणजी, सुरेश वाडकर या संगीतकारांनीही एन. दत्तांच्या आठवणी जागवल्या. एन. दत्तांच्या नावाने राज्य शासनाने पुरस्कार सुरू करावा, अशी सूचना या वेळी वाडकर यांनी केली. ‘एन. दत्तांची ‘सूर तेच छेडीता’ आणि ‘हे चिंचेचे झाड’ ही गाणी ड्रेसिंग रूममध्ये विशेषकरून गुणगुणली जायची. सहज गुणगुणता येणारी गाणी आम्हा क्रिकेटपटूंमध्ये लोकप्रिय होती म्हणून ते आमचे लाडके संगीतकार होते’, असे माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर या वेळी म्हणाले. ‘शरद पिळगावकरांनी जेव्हा मराठीत चित्रपट करायचे ठरवले तेव्हा गाणी एन.दत्ताच करतील असा निश्चय केला होता. त्याप्रमाणे पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक राजदत्त यांनी कथा ऐकवताच त्याला तत्काळ होकार दिला आणि अपराध हा माईल स्टोन चित्रपट निर्माण झाला’, असे शरद पिळगावकर यांचे पुत्र सचिन पिळगावकर यांनी सांगितले. ‘अपराधपाठोपाठ ‘मधुचंद्र’ हा चित्रपट तसा हलकाफुलका काहीसा चावट होता. तसे त्याचे संगीतही गुदगुल्या करणारे होते. या चित्रपटांनी मला इंडस्ट्रीत उभे केले. त्यापाठी या संगीतकाराचाही मोठा वाटा होता’, अशी कृतज्ञता ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात अमृता, अल्ताफ, नानू, निलाधर, नीलाद्र्री, रीमा, केका यांनी गाणी गायली. सचिन पिळगावकरांनी ‘हे चिंचेचे झाड’ आणि ‘सूर तेच छेडीता’ ही गाणी सादर केली.