वसई : रौप्य महोत्सवी कला-क्रिडा महोत्सवाचे काल संध्याकाळी उशीरा नरवीर चिमाजी आप्पा मैदानावर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. सन १९९० साली सुरू झालेल्या या कला-क्रिडा महोत्सवाने यंदा २५ व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्ताने हा महोत्सव आगळ्यावेगळ्या स्वरूपात होत आहे. सायंकाळी झालेल्या या उद्घाटन सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रसिद्ध सिने अभिनेते शिवाजी साटम आपल्या भाषणात म्हणाले, गेली २५ वर्षे हा कला-क्रिडा महोत्सव सुरू आहे यावर विश्वास बसत नाही. या महोत्सवाला मी अनेकदा भेटी दिल्या व कार्यकर्त्यांमधील जोश आणि उत्साह नक्कीच कौतुकास्पद आहे. या महोत्सव संपुर्ण देशात नावारुपाला आला आहे. यापुढेही तो असाच वाढत जावा अशी अपेक्षा करतो. त्यानंतर कार्यक्रमाचे सर्वेसर्वा आ. हितेंद्र ठाकूर आपल्या भाषणात म्हणाले, या महोत्सवात राबणारे कार्यकर्ते आपला वेळ व पैसा देऊन हा कार्यक्रम यशस्वी करत असतात. अनेक कार्यकर्ते २६ ते ३१ डिसें. दरम्यान रजा घेऊन काम करीत असतात. हा कार्यक्रम यंदा रौप्य महोत्सवी वर्षात दाखल झाला आहे. याचे संपूर्ण श्रेय या महोत्सवाच्या कार्यकर्त्यांनाच आहे हे मला इथे आवर्जुन सांगावेसे वाटते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर, रत्नाकर शेट्टी, व अन्य मान्यवरांची भाषणे झाली. व्यासपीठावर आ. क्षितीज ठाकूर, माजी महापौर राजीव पाटील, नगरसेवक पंकज ठाकूर, भाऊसाहेब मोहळ, महानगरपालिका आयुक्त गोविंद राठोड व इतर मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यानंतर मैदानी व इनडोअर स्पर्धांना सुरूवात झाली. (प्रतिनिधी)
रौप्य महोत्सवी कला-क्रीडा महोत्सवाला जल्लोषात सुरूवात
By admin | Updated: December 27, 2014 22:31 IST