Join us
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर शांतता, पण सोशल मीडियात घमासान सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:06 IST

रस्त्यावर शांतता, पण सोशल मीडियात घमासान सुरूच‘ते’ शिवसैनिक ‘वर्षा’वर; मुख्यमंत्र्यांची घेतली भेटलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राम ...

रस्त्यावर शांतता, पण सोशल मीडियात घमासान सुरूच

‘ते’ शिवसैनिक ‘वर्षा’वर; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राम मंदिराच्या प्रश्नावर शिवसेना भवन परिसरात भाजप आणि शिवसैनिकांमधील राड्यानंतर गुरुवारी दोन्ही पक्षांच्या कार्यालयांवर तणावपूर्ण शांतता होती. पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसह संवेदनशील ठिकाणांवरील बंदोबस्त वाढविला आहे. रस्त्यावर शांतता असली तरी सोशल मीडियात मात्र दोन्ही बाजूने घमासान सुरू आहे. आव्हान - प्रतिआव्हानाची भाषा केली जात आहे.

शिवसेना भवन परिसरातील राड्यानंतर दादर परिसरात गुरुवारी शांतता होती. राजकीय वर्तुळात मात्र उलटसुलट चर्चा सुरू आहे. मुंबईतील शिवसेना नेत्यांकडून या घटनेच्या निषेधाचे व्हिडिओ हिरीरीने प्रसारित करण्यात आले. शिवसेना भवनवर मोर्चा आणण्याच्या भाजपच्या भूमिकेवर आक्षेप घेतानाच पुन्हा असे प्रकार घडल्यास तीव्र प्रतिक्रियेचा इशाराही देण्यात आला. या घटनेनंतर शिवसेना आक्रमक झाल्याचे चित्र सध्या आहे, तर बुधवारी जशास तसे उत्तर देण्याची भाषा करणारे भाजप नेते काहीसे बॅकफूटवर गेलेले पाहायला मिळाले.

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या आक्रमक भाषेला उत्तर देताना गुरुवारी भाजपने कायदा सुव्यवस्था आणि विकासाचा मुद्दा मांडला. राडेबाजी ही शिवसेनेची आधीपासूनची संस्कृती आहे. त्यात आता महिलांवरील हल्ल्याची भर पडली आहे. तुम्ही राड्याची तारीख सांगा, आम्ही विकासकामांच्या तारखा सांगतो, अशी भूमिका भाजपच्या मुंबई महिला अध्यक्षा आणि स्थानिक नगरसेविका शीतल गंभीर यांनी मांडली.

दरम्यान, बुधवारच्या राड्यात आघाडीवर असलेल्या शिवसैनिकांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेनेशी संबंधित अकाऊंटवर कौतुकासाठीच ही भेट झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी मात्र ही भेट पूर्वनियोजित असल्याचे म्हटले आहे.

* शांतता राखण्याचे आवाहन!

राजनंदा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कोविड काळात विविध कामे झाली. ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाखांचा चेक द्यायचा होता. त्यासाठी ही भेट होती, असा दावा सरवणकर यांनी केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारच्या घटनेची चौकशी केली. आपण सत्तेत असल्याने कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आपली आहे, आपण शांतता राखायला हवी, असे मुख्यमंत्री म्हणाले. यापेक्षा जास्त काही या विषयावर त्यांनी भाष्य केले नसल्याचे सरवणकर म्हणाले.

-------------------