मुंबई : राज्यातील प्रमुख शहरांच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदवण्यात येत असतानाच मागील दोन दिवसांपासून मुंबईच्या कमाल तापमानातही कमालीची वाढ झाली आहे. शहराचे कमाल तापमान ३२ अंशावरून थेट ३४ ते ३६ अंशावर पोहोचले आहे. पुढील ४८ तासांसाठी शहरातील वातावरण ढगाळ राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मागील दोन दिवसांत तापमानात दोन अंशाची वाढ नोंदविण्यात आल्याने वातावरणात झालेल्या बदलाचा मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. (प्रतिनिधी)वाढलेल्या तापमानामुळे डोकेदुखी, घसादुखीचे प्रमाण वाढले आहे. शिवाय कमाल आणि किमान तापमानात चढउतार नोंदवण्यात येत असून, वातावरण काहीसे धूळमय झाले आहे. अशावेळी रस्त्यांवरील अन्नपदार्थांवर धूळीकण जमा झाल्याने त्याचे सेवन टाळावे. अन्यथा पोटदुखी, उलट्या-जुलाब असे त्रास बळावण्याची भीती आहे. विशेषत: उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होत असते. अशावेळी अधिकाधिक पाणी पिण्याची गरज आहे.- डॉ. अनिल पाचणेकर, फॅमिली फिजिशियन
मुंबईच्या तापमानात लक्षणीय वाढ
By admin | Updated: March 13, 2016 03:51 IST