मुंबई : विकासक व फेडरेशनमुळे मागील २७ दिवसांपासून चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीमधील रहिवासी विजेअभावी अंधारात राहत आहेत. या संदर्भात चर्चा करण्यासाठी सिद्धार्थ कॉलनीमधील रहिवाशांचे शिष्टमंडळ टिळकनगर येथील अदानी इलेक्ट्रिसिटीच्या कार्यालयात गेले. यावेळी कंपनीने वीजकपात मागे घेण्यास नकार दिला. याबाबत निर्णय घेण्यासाठी दोन दिवस द्या, असे सांगण्यात आले. यामुळे संतप्त रहिवाशांनी कंपनीच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले.अदानी कंपनीने जेव्हा सिद्धार्थ कॉलनीमधील वीजकपात सुरू केली, त्यावेळी चालू महिन्याचे वीजबिल पन्नास टक्के रहिवाशांनी भरले, तरच वीज पूर्ववत करू, असे आश्वासन कंपनीने दिले होते. आतापर्यंत १,८६७ कुटुंबांनी चालू महिन्याचे विजबिल भरले आहे. तरीही कंपनीकडून वीजकपात सुरू आहे. जी वीजकपात पूर्वी सकाळी ५ ते सायंकाळी ७ अशी होत होती. ती आता रात्री २ ते सायंकाळी ७ अशी करण्यात येत आहे. यामुळे कंपनी आपल्या शब्दावर ठाम नाही, अशी रहिवाशांची तक्रार आहे.जोवर आमची वीज पूर्ववत होत नाही, तोवर आम्ही गेटसमोरून हलणार नाही, असा पवित्रा रहिवाशांनी घेतला. यामुळे परिसरात बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या आंदोलनामुळे कार्यालयातील कर्मचारी आत अडकले होते. यासोबतच वीजबिल भरण्यासाठी गेलेले इतर नागरिकही आत अडकून पडले होते.सिद्धार्थ कॉलनी येथील वीजपुरवठा थकीत बिलासंबंधाने १७ जुलैपासून खंडित केला आहे. १ हजार ७०० ग्राहकांनी एक महिन्याची बिले भरली आहेत, तरीही वीजपुरवठा चालू नसल्याने सिद्धार्थ कॉलनीतील १०० ते १५० नागरिक अदानी कार्यालयाबाहेर आले होते. कामगारांना जाऊ देण्यात आले आहे.- जयप्रकाश भोसले,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,चेंबूर पोलीस ठाणेआम्ही शनिवारी उपोषणाला बसणार होतो. पण, चेंबूरच्या पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरिक्षकांनी अदानीसोबत चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले. आज आम्ही चर्चेला गेलो, तेव्हा ज्यांच्या हातात निर्णय घेण्याची क्षमता नाही, अशा माणसांना कंपनीने चर्चेला बसवले. आता मंगळवारी पोलीस उपायुक्तांनी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले आहे. ही शेवटची चर्चा असेल. जर तोडगा निघाला नाही तर आंदोलन तीव्र केले जाईल.- राजू घेगडमल, रहिवासी
सिद्धार्थ कॉलनीच्या रहिवाशांचा अदानी इलेक्ट्रिसिटीच्या कार्यालयावर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 02:44 IST