Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्यामवर रायचा जामिनासाठी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 04:44 IST

शीना बोरा हत्या प्रकरणातील माफीचा साक्षीदार व इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर श्यामवर राय याने जामिनावर सुटका व्हावी, यासाठी विशेष सीबीआय न्यायालयाला शुक्रवारी विनंती केली.

मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणातील माफीचा साक्षीदार व इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर श्यामवर राय याने जामिनावर सुटका व्हावी, यासाठी विशेष सीबीआय न्यायालयाला शुक्रवारी विनंती केली. घरी कमवणारे कोणी नसल्याने कुटुंबासाठी हा अत्यंत कठीण काळ आहे. त्यामुळे जामिनावर सुटका करण्यात यावी, अशी विनंती राय याने विशेष न्यायालयाला केली.विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जे.सी. जगदाळे यांच्या निर्देशावरून रायला न्यायालयात हजर केले. त्याची बाजू मांडण्यासाठी वकील नियुक्त नसल्याने न्यायाधीशांनी त्याला त्याचे म्हणणे मांडण्यास सांगितले. जेलमध्ये असल्याने पत्नी व मुलांची आबाळ होत असल्याचे सांगताना रायला अश्रू अनावर झाले. तेव्हा काही महिन्यांपूर्वी तूच न्यायालयाला सांगितले होतेस की, तुझ्या जिवाला धोका आहे. खटला संपेपर्यंत तुझ्या जिवाला धोका आहे, असे न्यायाधीशांनी सांगताच रायने आता आपल्या जिवाला आयुष्यभर धोका असल्याचे म्हटले.रायच्या जामीन अर्जाबाबत काय म्हणणे आहे, असे न्यायालयाने सीबीआयच्या वकील कविता पाटील यांना विचारले. पाटील यांनी रायचा अर्ज सीबीआयकडे पाठविला असून ते त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेची वाट पाहत आहेत. पुढील आठवड्यात सूचना मिळतील, असे न्यायालयाला सांगितले. सीबीआयचे उत्तर आल्यानंतर न्यायालय रायच्या अर्जावर निर्णय घेणार आहे.