मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वे मार्गांवर सातत्याने बिघाड होत असून त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. सायन स्थानकाजवळ डाऊन मार्गावर रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वे सकाळच्या सुमारास कोलमडल्याची घटना घडली. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप झाला. मध्य रेल्वच्या सायन आणि कुर्ला स्थानकादरम्यान डाऊन धिम्या मार्गावर सकाळी सव्वासातच्या सुमारास रुळाला तडा गेला. कर्मचाऱ्यांनी लगेच दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र या घटनेमुळे प्रवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागले. डाऊन धिम्या मार्गावर घटना घडल्याने या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर वळविण्यात आल्या आणि त्याचा फटका धिम्या आणि जलद लोकल सेवेला बसला. लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत असल्याने लोकल गाड्यांना बरीच गर्दी झाली. वीस मिनिटांनंतर रुळातील बिघाड दुरुस्त करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आणि त्यानंतर धिमा लोकल मार्ग पूर्ववत करण्यात आला. सकाळी नऊ वाजेपर्यंत लोकल दहा मिनिटे उशिराने धावत होत्या. (प्रतिनिधी)
सायन स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा
By admin | Updated: January 8, 2015 00:54 IST