कल्याण : केडीएमसीच्या नगररचना विभागातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात ३ उपअभियंते आणि १० कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे. मात्र नगररचना विभागातील गैरव्यवहारप्रकरणी नागनूरे समितीने ठपका ठेवलेले उपअभियंता सुरेंद्र टेंगळे यांच्याकडे भूसंपादन विभागाचा कार्यभार सोपविताना नगररचना विभागाची अतिरीक्त जबाबदारी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.बांधकाम मंजूरी देताना अनियमितता तसेच टीडीआर घोटाळयांनी नगररचना विभाग आधीच वादग्रस्त ठरला आहे. यात काही अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे हा विभाग नेहमीच चर्चेत राहीला आहे. दरम्यान नगररचना विभागात नुकतेच फेरबदल करण्यात आले आहेत. कल्याणचे नगररचनाकार सुभाष पाटील यांची डोंबिवलीचे नगररचनाकार म्हणून बदली करण्यात आली आहे. तर उपअभियंता रघुवीर शेळके यांच्याकडे दक्षता व गुणनियंत्रण विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर आडके, शशिम केदार यांची बांधकाम विभागात तर मनोज सांगळे, सचिन घुटे आणि मच्छींद्र हंचाटे यांची पाणीपुरवठा विभागात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्तजागी महेश डावरे, अनुप धुवाड, लिलाधर नारखेडे, सोमा राठोड, संजय आचवले या पाणीपुरवठा आणि बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्यांची बदली करण्यात आली आहे.विशेष म्हणजे गैरव्यवहारप्रकरणी ठपका ठेवल्याने तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी उपअभियंता टेंगळे यांची नगररचना विभागातून उचलबांगडी केली होती. परंतु सहा महिन्यापुर्वी ते पुन्हा नगररचना विभागात रूजू झाले. नगररचना विभागातील अन्य प्रकरणांमध्येही ते वादग्रस्त ठरले असताना आता त्यांच्याकडे पुन्हा डोंबिवलीचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
कल्याण नगररचना विभागात फेरबदल
By admin | Updated: May 6, 2015 01:29 IST