Join us

शुभा राऊळ पुन्हा शिवसेनेत!

By admin | Updated: January 8, 2015 02:02 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर आमदारकी लढविलेल्या मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मुंबई : ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम उपनगरातून शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर आमदारकी लढविलेल्या मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुधवारी शुभा राऊळ यांनी मातोश्रीवर भेट घेतली असून, पक्षप्रमुखांनी नाराजी दूर केल्याने आपण पुन्हा शिवसेनेत दाखल होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेनेचे दहिसर येथील माजी आमदार विनोद घोसाळकर आणि माजी महापौर शुभा राऊळ यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. अगदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत हा वाद पोचून सुद्धा यावर काहीच तोडगा निघत नव्हता. परिणामी ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत शुभा राऊळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर दहिसर येथून विनोद घोसाळकर यांच्या विरोधात उभ्या राहिल्या होत्या. परंतु येथे घोसाळकर यांच्यासह राऊळ यांचादेखील पराभव झाला.विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता स्थापन होऊन काही दिवस उलटत नाहीत, तोवर डॉ. शुभा राऊळ या पुन्हा स्वगृही परतल्या आहेत. बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून, या प्रवेशावर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, की मी पक्ष सोडला नव्हता;मला मनसेकडून उमेदवारी मिळाली आणि मी निवडणूक लढविली. (प्रतिनिधी)शुभा राऊळ म्हणाल्या की, मी पक्ष सोडला नव्हता; मला विनोद घोसाळकर यांच्याविरोधात निवडणूक लढवायची होती. मला मनसेकडून उमेदवारी मिळाली आणि मी निवडणूक लढविली. मात्र आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर माझी नाराजी दूर झाली.