Join us

श्रीराम मंदिर निधी संकलन अभियानाला मुंबईत सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:08 IST

मुंबई : अयोध्येतील प्रस्तावित श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी मुंबईत निधी संकलन अभियानाला शुक्रवारपासून सुरूवात झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ...

मुंबई : अयोध्येतील प्रस्तावित श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी मुंबईत निधी संकलन अभियानाला शुक्रवारपासून सुरूवात झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते २७ फेब्रुवारीपर्यंत घरोघरी जाऊन मंदिरासाठी निधी उभारण्याचे काम करणार असल्याची माहिती साध्वी ऋतुंभरा यांनी दिली.

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत साध्वी ऋतुंभरा म्हणाल्या की, १५ जानेवारीपासून निधी संकलन अभियानाला सुरूवात झाली आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा मंदिर उभारणीत सहभाग असावा, यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. राम मंदिरासाठी मोठे आंदोलन, संघर्ष झाले. वर्गणी जमा करतानाच या संघर्षाची आठवण करून द्यावी. प्रत्येक घरातून योगदान यावे, अशी भूमिका आहे. एखाद्या किंवा काही श्रीमंत लोकांच्या देणगीतून मंदिर उभारणे सहज शक्य आहे. मात्र, अयोध्येतील मंदिर हे देशावासियांचे आहे. त्यात सर्वांचा सहभाग असायला हवा, त्यासाठी सर्व रामभक्तांकडून निधी उभारला जाईल, असे त्या म्हणाल्या.

मुंबईसह राज्यातील अडीच कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याची योजना आखल्याचे विश्व हिंदू परिषदेचे शंकर गायकर यांनी सांगितले. निधी अभियानासाठी दहा रूपये, शंभर रूपये आणि हजार रूपयांचे कुपन तयार करण्यात आले आहेत. याशिवाय मोठ्या देणगीसाठी स्वतंत्र पुस्तिका बनविण्यात आली आहे. सर्व राजकीय पक्ष, संघटनांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता सर्वांकडे आम्ही जाणार आहोत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही भेटण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे गायकर यांनी सांगितले.