Join us

कोळंबी शेती फायदेशीर

By admin | Updated: April 4, 2015 22:52 IST

महागाई, डिझेल, बर्फाचे वाढते भाव, मजुरी, शिवाय मत्स्य उत्पादनात सतत घट होत आहे.

डहाणू : महागाई, डिझेल, बर्फाचे वाढते भाव, मजुरी, शिवाय मत्स्य उत्पादनात सतत घट होत आहे. पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर पाच - सहा वर्षापासून पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारे मच्छीमार बांधव या मासळी दुष्काळामुळे हवालदिल झाले असून डहाणू व परिसरातील असंख्य मच्छीमारांनी कोळंबी शेतीत आपले नशीब आजमाविले आहे. ही कोळंबी शेती फायदेशीर ठरत असून या क्षेत्रात यंदा अनेक सुशिक्षित बेकार तरुणांनी खाजण जमीन विकसित केली आहे.कोकणातील विशेषत: पालघर जिल्ह्यातील शासकीय खांजणपाडा जागा स्थानिक भूमिपुत्रांना भाडेतत्वावर देऊन सुधारित तंत्रज्ञान पद्धतीने कोळंबी संवर्धन करण्याचा २००१ चा शासन निर्णय आहे. त्या अनुषंगाने स्थानिक मच्छीमार व बेरोजगारांनी शासनाकडून कोळंबी संवर्धनासाठी प्रत्येकी पाच हेक्टर जागा मिळवून खाजण जमिनी विकसित केल्या आहेत.डहाणू तालुक्यातील वडकून, मानफोडपाडा, आगवन, लोणीपाडा, बाडापोखरण, चिखला, वानगाव, चंडीगाव, वरोर, चिंचणी, इ. गावात १०५ कोळंबी संवर्धनधारक आहेत. येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात टायगर व व्हेनामी कोळंबी शेती केली जाते. येथील मच्छीमार तरुण रात्रंदिवस मेहनत करून प्रत्येक तीन, चार महिन्यांनी त्याचे उत्पन्न घेत असते. गुजरात तसेच मुंबईतील मोठमोठे व्यापारी डहाणूत कोळंबी खरेदीसाठी आल्याने कोळंबी प्रकल्पधारक खूश आहेत. शिवाय, डहणूची ही कोळंबी परदेशात निर्यात केली जात असल्याने त्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात परकीय चलन प्राप्त होत असते. (वार्ताहर)४दरम्यान समुद्राशी रात्रंदिवस झुंज देऊन पारंपरिक मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छीमारांना गेल्या काही वर्षात या व्यवसायात प्रचंड मंदी आली असतानाच दोन,तीन महिन्यापासून बाहेरील शेकडो पर्ससीन नेटधारकांनी पालघर जिल्ह्याच्या समुद्रात मासेमारी सुरू केली. ४परिणामी परंपरागत पद्धतीने मासेमारी करणाऱ्या कव व दालदांच्या मच्छीमारांना बोटी रिकाम्याच घेऊन परतावे लागत आहे. याबाबत शासन, प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याने येथील भूमिपुत्रांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे कोळंबी संवर्धन हा पर्याय व्यवसाय म्हणून उपयुक्त ठरला आहे.