Join us  

स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षपदी श्रद्धा जाधव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2020 3:54 AM

उपनगरे अध्यक्षपदी श्रीकांत शेट्ये; काँग्रेसने माघार घेतल्याने वाढले शिवसेनेचे संख्याबळ

मुंबई : काँग्रेसने माघार घेतल्यामुळे संख्याबळ अधिक असलेल्या शिवसेनेने भाजपचा पराभव करीत वैधानिक समित्यांचे अध्यक्षपद मिळवले. त्यानंतर आता विशेष समित्यांमध्येही शिवसेनेचे वर्चस्व असेल. पालिका मुख्यालयात बुधवारी पार पडलेल्या निवडणुकीत स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षपदी शिवसेनेच्या श्रद्धा जाधव तर स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्षपदी श्रीकांत शेट्ये यांची निवड झाली. महापालिकेतील सर्व समित्यांचा कार्यकाळ ३१ मार्च रोजी संपुष्टात आला. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका सहा महिने लांबणीवर पडल्या. परिणामी, मुंबईतील विकासकामे खोळंबल्याने अखेर राज्य सरकारने वैधानिक, विशेष आणि प्रभाग समित्यांच्या निवडणुका घेण्याची परवानगी दिली.त्यानुसार स्थायी, शिक्षण आणि सुधार या वैधानिक समित्यांच्या नवीन अध्यक्षांची निवड नुकतीच झाली.  दरम्यान, स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षपदी शिवसेनेच्या श्रद्धा जाधव या १७ मते मिळवून विजयी झाल्या, तर भाजपच्या सुरेखा लोखंडे यांना १३ मते मिळाली. स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्षपदी शिवसेनेचे श्रीकांत शेट्ये हे १७ मते मिळवून विजयी झाले. तर भाजपचे सागरसिंग ठाकूर यांना १२ मते मिळाली. स्थापत्य समिती (शहर) उपाध्यक्षपदी शिवसेनेचे दत्ता पोंगडे तर स्थापत्य समिती (उपनगर) उपाध्यक्षपदी दिनेश कुबळ यांची निवड झाली.