मुंबई : राज्यात गेली १५ वर्षे सत्तेवर राहिलेल्या सरकारने सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत केवळ घोटाळे करून ठेवले आहेत. कुर्ला (पूर्व) मतदारसंघही अनेक सुविधांपासून वंचित राहिला असून आमदाराविरुद्धचा रोष मतदानातून प्रकट करा, असे आवाहन भाजपा- रिपाइं महायुतीचे उमेदवार विजय कांबळे यांनी केले. कुर्ला येथील लोकमान्य नगर, कुर्ला गार्डन परिसरात काढण्यात आलेल्या पदयात्रेत ते बोलत होते. कांबळे म्हणाले, ‘हा मतदारसंघ राखीव असल्याने इथल्या विकासकामांसाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज होती. मात्र सत्ताधाऱ्यांनी प्रलंबित प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने जनता त्यांना कंटाळली आहे. सेनेबरोबर युती असताना त्यांच्या वाट्याला हा मतदारसंघ होता. मात्र आता भाजपा व मित्रपक्षाच्या माध्यमातून आपल्याला उमेदवारी मिळाली आहे. केंद्राप्रमाणे राज्यातही भाजपाची एकहाती सत्ता येणार असून निवडून आल्यानंतर आपण मतदारसंघातील वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेले प्रश्न, विकासकामे मार्गी लावू.’ या वेळी कार्यकर्त्यांसमवेत टी. के. वाडी, एल. बी. एस. मार्ग, साईनगर परिघवाडीत प्रचार यात्रा काढण्यात आली. नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. रॅलीत महिला, युवकांची संख्या लक्षणीय होती. (प्रतिनिधी)
सत्ताधा-यांच्या विरोधातील रोष मतदानातून दाखवा
By admin | Updated: October 8, 2014 02:05 IST