Join us

आता आम्ही इथेच जीव सोडायचा का? तुळशीवाडीतील रहिवाशांचा उद्विग्न सवाल

By रतींद्र नाईक | Updated: August 14, 2023 13:01 IST

आम्ही या मोडक्या इमारतीतच आमचा जीव सोडायचा का? 

रतींद्र नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात घर गेले तेव्हापासून तुळशीवाडीच्या संक्रमण शिबिरात वर्षानुवर्षे राहात आहोत. या घरांपेक्षा जनावरांचे कोंडवाडे तरी बरे. छतातून पाणी गळत आहे. घरातल्या वस्तूंना हात लावला की शॉक लागतो. इतकेच काय तर गंजलेले स्लॅब, मोडकळीस आलेली इमारत कधीही कोसळेल, अशी अवस्था झाली आहे. आम्ही या मोडक्या इमारतीतच आमचा जीव सोडायचा का? 

आम्हाला आमच्या हक्काचे घर कधी मिळणार? असा सवाल तुळशीवाडीतील ७२ वर्षीय जयाबेन सोलंकी यांनी उपस्थित केला. मुंबई सेंट्रल येथील तुळशीवाडीत पोस्ट ऑफिसजवळच तळ अधिक चार मजली संक्रमण शिबिराची इमारत आहे. झोपड्या तोडून विकासकाने जागा ताब्यात घेतल्याने येथील मूळ रहिवाशांना या संक्रमण शिबिराच्या इमारतीत हलविण्यात आले. २०१४ पासून या इमारतीत रहिवासी राहात आहेत. इमारतीची अवस्था जर्जर झाली आहे. छप्पराला गळती लागली आहे, इमारतींच्या भिंतीना छिद्र पडली आहेत. त्यामुळे घुशींचा वावर वाढला आहे. इमारतीतील पायऱ्या तुटल्या असून, स्लॅब गंजल्यामुळे पावसाचे पाणी प्रत्येकाच्या घरात गळत आहे.

रोजचा दिवस ढकलण्याशिवाय पर्याय नाही. या इमारतीत ३९ घरे असून, दयनीय अवस्था झालेल्या या इमारतीत १४ कुटुंबे सन २०१४ पासून राहात आहेत. इतर ठिकाणचे भाडे परवडत नाही. त्यामुळे दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, अशी व्यथा या रहिवाशांनी मांडली. आज किंवा उद्या आपल्याला हक्काचे घर मिळेल, या आशेवर येथील रहिवासी रोजचा दिवस ढकलत आहेत.

पुनर्वसनाची इमारत तयार, पण...

विकासकाने पुनर्वसनाची इमारत संक्रमण शिबिरापासून काही अंतरावर बांधली आहे. मात्र, विकासकाकडून पुनर्वसनाच्या इमारतीतील घरांचा ताबाच रहिवाशांना दिला जात नाही. गेल्या ८ वर्षांत दोनदा सोडत निघाली पण अजूनही हक्काची घरे न मिळाल्याने रहिवासी मेटाकुटीला आले आहेत.

 

टॅग्स :म्हाडा