मुंबई : मध्य रेल्वेने आपल्या लोकलच्या वेळापत्रकात बदल केला खरा; मात्र बदललेल्या लोकलच्या वेळापत्रकाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकर चाकरमान्यांना फटका बसला आणि त्यांचेही वेळापत्रक कोलमडले. महत्त्वाचे म्हणजे वेळापत्रक कोलमडल्याने मरेला लोकलच्या तब्बल आठ फे:या रद्द कराव्या लागल्या. परिणामी 15 मिनिटे विलंबाने धावणा:या लोकलमुळे चाकरमान्यांची तारंबळ उडाली.
मध्य रेल्वेने आपले बदललेले लोकलचे वेळापत्रक 15 नोव्हेंबर(शनिवार)पासून लागू केले. मात्र दररोजच्या धावपळीत असणा:या मुंबईकरांना बदलत्या वेळापत्रकाचा अंदाज आला नाही. शिवाय मरे प्रशासनाकडूनही बदलत्या वेळपत्रकाची अंमलबजावणी करताना तारांबळ उडाली. परिणामी वारंवार लोकलचे वेळापत्रक कोलमडल्याने धावणा:या लोकल 15 मिनिटे विलंबाने रेल्वे स्थानकांवर येत होत्या. शिवाय लोकलच्या आठ फे:या रद्द झाल्याने वेळापत्रक आणखीच कोलमडून पडले होते. विशेषत: शनिवार असला तरी सकाळी लोकलची गर्दी कायम राहिल्याने बदलत्या वेळापत्रकाचा प्रवाशांना फटका बसला. सवयीनुसार, वेळेवर येणा:या लोकलची वाट पाहत बसलेल्या चाकरमान्यांना भलत्याच लोकलमध्ये स्वार व्हावे लागले. सकाळी मध्य रेल्वेच्या भायखळा, दादर, सायन, कुर्ला, घाटकोपर, भांडुप आणि मुलुंड अशा प्रमुख स्थानकांवर यामुळे सारखेच चित्र पाहण्यास मिळाले.
दरम्यान, मध्य रेल्वेने मात्र याबाबत सावध पवित्र घेतला असून, लोकल वेळेवर आणण्यासाठीच हा खटाटोप असल्याचे म्हटले आहे. शिवाय शनिवारची सकाळ वगळता दुपारनंतर सायंकाळी लोकल वेळेवर धावण्यास सुरुवात झाल्याचेही
मरे प्रशासनाने स्पष्ट केले
आहे. (प्रतिनिधी)