बदलापूर : बैलगाडीच्या शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही अंबरनाथ तालुक्यात सुरू असलेल्या शर्यतींची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. शहर आणि ग्रामीण परिसरातील पोलिसांवर कारवाईची शक्यता असल्याने हबकलेल्या पोलिसांनी धावपळ करीत गोळीबार करणाऱ्या सात जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून रिव्हॉल्व्हरही जप्त करण्यात आले आहे. गुन्हा दाखल करताना आर्म्स अॅक्टचा तपशील खोडलेला असला तरी प्रत्यक्षात त्याच कायद्याखाली या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंदी असूनही शर्यती सुरू असल्याचे गोळीबार प्रकरणातून स्पष्ट झाल्याने पोलिसांवर हे प्रकरण शेकणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घातल्याने बैलगाडी शर्यती आयोजित करणाऱ्यांविरोधातही गुन्हे दाखल करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यासाठी आवश्यक तो तपशील गोळा करण्याचे काम सुरू आहे. बदलापूरजवळील एरंजाड गावात गांवदेवी मंदिराजवळील मैदानावर बैलगाड्यांची शर्यत सुरु असतांना दोन गटात हाणामारी झाली. त्यातील एका गटातील व्यक्तींनी दुसऱ्या गटातील तरूणांवर गोळीबार केला. रविवारी सायंकाळी ही घटना घडूनही सोमवारी याबाबत पोलिसांनी फारशा हालचाली केल्या नव्हत्या. बदलापूरच्या आगार आळीत राहणारे रिक्षाचालक तुषार राजाराम गायकर बैलगाडीच्या शर्यती पाहण्यासाठी गेले होते. शर्यती रंगात असतांनाच अंबरनाथच्या चिखलोली येथील एका गटाच्या बैलाने आंबेशिव गावातील बैलांवर उडी मारली. त्यामुळे गायकर यांनी दिलेल्या सल्ल्यावरून हा वाद पेटला होता. चिखलोलीतील अविनाश पवार, उमेश पवार, गण्या काका पवार, रवी पवार, राज्या पवार, अनंता सासे आणि लक्ष्मण पवार यांनी बेदम मारहाण केल्याची तक्रार गायकर यांनी केली होती. गायकर यांच्या बचावासाठी आलेल्या सुनील कांबरी यांनाही मारहाण झाली होती. मारहाणीनंतर अविनाश पवार याने त्याच्याकडील बंदुकीतुन दोन राऊंड फायर केल्या होत्या. त्यातील एक गोळी कानाजवळून गेल्याचे गायकर यांचे म्हणणे होते. गोळीबारामुळे गायकर आणि त्यांचे साथीदार घटनास्थळावरुन पळून गेले. शर्यतीच्या ठिकाणीही पळापळ झाली. मात्र तक्रार दाखल करून घेताना पोलिसांनी आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला, पण एफआयआरच्या कॉपीला व्हाइटनर लावून ते गुन्हे वगळले होते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ प्रसिद्ध झाले. (प्रतिनिधी) शर्यती आयोजित करणारेही रडारवरवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बंदीनंतरही शर्यती सुरू असल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. बदलापूरच्या शहर आणि ग्रामीण भागातील पोलिसांकडून याबाबतचा खुलासा मागवण्यात येणार असल्याचे समजते. त्याचबरोबर या शर्यती आयोजित करणारेही पोलिसांच्या रडारवर असल्याने त्यांच्यातही घबराट पसरली आहे. गोळीबार प्रकरणामुळे आधीच शर्यतीच्या ठिकाणी पळापळ झाली होती. आता त्या भागात पूर्ण शांतता आहे. आरोपींचे पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडे परवाना असला तरी चुकीच्या कारणासाठी त्याचा वापर झाला आहे.
गोळीबार करणारे अटकेत
By admin | Updated: June 15, 2016 02:28 IST