Join us  

‘लघुपटा’च्या माध्यमातून उलगडणार ‘मुंबई’चे अंतरंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 10:25 AM

मुंबईची जीवनशैली, झगमगते बॉलिवूड, इथली खाद्यसंस्कृती, हेरिटेज वास्तू, ट्रेन, मुंबईचा डबेवाला, कलाकारांचे बंगले, फिल्म सिटी हे मुंबईचे वैभव.

मुंबई :मुंबईची जीवनशैली, झगमगते बॉलिवूड, इथली खाद्यसंस्कृती, हेरिटेज वास्तू, ट्रेन, मुंबईचा डबेवाला, कलाकारांचे बंगले, फिल्म सिटी हे मुंबईचे वैभव. इथला सांस्कृतिक वारसा आता लघुपटाच्या रूपात साकारला जाणार  आहे. ‘युनेस्को’तर्फे जागतिक स्तरावर या लघुपटाचे प्रदर्शन केले जाणार आहे. हा लघुपट तयारकरण्यासाठी पालिकेच्या व्यवसाय विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांच्या अवधीत या लघुपटाच्या माध्यमातून मुंबईचे अंतरंग  उलगडले जाईल. ‘युनेस्को क्रिएटिव्ह सिटी ऑफ मुंबई’ या शीर्षकांतर्गत लघुपट तयार होणार  आहे. 

मुंबईची स्वतःची वेगळी ओळख आणि संस्कृती आहे. अगदी इथला वडापाव असो की  डबेवाला; त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली आहे. 

 अमिताभ बच्चन यांचा जलसा आणि प्रतीक्षा बंगला, शाहरुख खानचा मन्नत बंगला पाहण्यासाठी जुहू आणि वांद्रे भागात दररोज शेकडो लोक या ठिकाणी येत असतात. 

 त्यांच्या चाहत्यांचे-पर्यटकांच्या आकर्षणाचे हे बंगले म्हणजे मुख्य आकर्षण आहेत. या दोघांसह अन्य कलाकारांचे बंगलेही लघुपटात पाहायला मिळतील. 

 सिनेमे आणि मालिकांच्या चित्रीकरणाचे मुख्य केंद्र असलेली फिल्म सिटी, डबिंग स्टुडिओ, इथली मुख्य सिनेमागृहे  लघुपटात असतील. 

 मुंबईत अनेक  हेरिटेज वास्तू आहेत. गेट वे ऑफ इंडिया आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  थाट अनुभवता येईल.

 मुंबईच्या खाद्यसंस्कृतीची नेटक्या शब्दांत ओळख करू दिली जाईल. विविध पर्यटनस्थळे लघुपटाच्या माध्यमातून जगभर पोहोचतील.

मुंबईची जीवनशैली, झगमगते बॉलिवूड, इथली खाद्यसंस्कृती, हेरिटेज वास्तू, ट्रेन, मुंबईचा डबेवाला, कलाकारांचे बंगले, फिल्म सिटी हे मुंबईचे वैभव.

‘युनेस्को’तर्फे जागतिक स्तरावर होणार प्रदर्शन :

लघुपट तयार करण्यासंदर्भात कल्पना, संकल्पना जाणून घेण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. त्या एकत्र केल्यानंतर लघुपटाला अंतिम स्वरूप देण्यात येईल. लघुपट बनवण्यासाठी पालिका २६ लाख रुपये खर्च करणार आहे. पाच ते सात मिनिटांचे दोन लघुपट तयार केले जातील. मुंबईत आंतरराष्ट्रीय पर्यटकही मोठ्या संख्येने मुंबईत येत असतात. 

टॅग्स :मुंबईशॉर्ट फिल्म