लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : यू-ट्युबवरील एक व्हिडिओ पाहून ‘प्रॅक ॲप’ तयार करत त्यामार्फत दुकानदारांची फसवणूक करून लुटणाऱ्या अल्पवयीन मुलासह त्याच्या पित्याला मेघवाडी पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, यू-ट्युबवरील हा व्हिडिओ काढण्याची विनंती पोलिसांनी संबंधित विभागाला केली आहे.
मेघवाडी पोलिसांना एका दुकान मालकाकडून तक्रार प्राप्त झाली होती. ज्यात ई-वॉलेटद्वारे ग्राहकाने दिलेले पैसे त्यांच्या खात्यात जमाच झाले नाहीत असे त्यांचे म्हणणे होते. त्यानुसार पोलिसांनी या गुन्ह्याची दखल घेत तपास सुरू केला. त्यानंतर पुन्हा अशीच तक्रार दुसऱ्या दुकानदारांकडून करण्यात आल्यावर दखलपात्र गुन्ह्याची नोंद करत ईवॉलेटमार्फत पैसे दिल्याचा दावा करणाऱ्या १५ वर्षांच्या मुलाला ताब्यात घेत चौकशी सुरू करण्यात आली. तेव्हा यूट्युबवर ‘प्रॅक’ ॲप तयार करण्यास शिकविणारा व्हिडिओ त्याने पाहिला. ज्यात क्यूआर कोड स्कॅन करत तो कसा बदलायचा याबाबत सांगण्यात आले होते. त्याच्या मदतीने एखाद्या क्यूआर कोड मालकीच्या व्यक्तीला दिलेले पेमेंट ॲपमध्ये दाखवते. पण, प्रत्यक्षात त्याच्या खात्यात पैसे जातच नाहीत, असे मुलाने सांगितले. तेव्हा मुलाच्या मोबाइलमध्ये त्याने लपवून ठेवलेले प्रॅक ॲप पोलिसांनी शोधले. यात त्याचे वडील त्याला मदत करीत असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले आहे. तसेच पैसे भरल्यानंतर खाते तपासत रक्कम मिळाली आहे की नाही याची खात्री करण्याचे आवाहन पोलिसांनी दुकानदारांना करत सतर्क केले असून यूट्युबवरील व्हिडिओ काढून टाकण्याची विनंती संबंधित विभागाला करण्यात आली आहे.