मुंबई : एकतर्फी झालेल्या सामन्यात मुंबई महानगरपालिकेच्या विकास धारीया याने अनपेक्षित निकाल नोंदवताना अग्रमनांकीत संदीप देवरुखकरला २-० असा धक्का देऊन मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत खळबळ माजवली. दुसऱ्या बाजूला महानगरपालिकेच्या भरत कोळीने देखील झुंजार खेळीसह विजयी आगेकूच केली.मुंबई जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने द बॉम्बे आंध्र महासभा अॅण्ड जिमखानाच्या वतीने सुरु असलेल्या या स्पर्धेत विकासने जबरदस्त खेळ करताना संभाव्य विजेत्या संदीपचे आव्हान संपुष्टात आणण्याची कामगिरी केली. पहिल्या गेममध्ये आक्रमक खेळ करुन आघाडी घेतलेल्या विकासने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी संदीप दमदार पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. मात्र पहिला गेममधील विजय फ्ल्यूक नसल्याचे सिध्द करताना विकासने पुन्हा एकदा आक्रमक खेळ करताना संदीपला फारशी संधी न देता नमवले आणि २५-१२, २५-१९ अशा विजयासह दिमाखात आगेकूच केली.दुसऱ्या बाजूला महानगरपालिकेच्या भरत कोळीने तीन गेमपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात स्कॉर्पियनच्या एन. नाईक याला नमवले. पहिला गेम गमावून पिछाडीवर पडल्यानंतर भरतने जबरदस्त पुनरागमन करताना सलग दोन गेम जिंकून नाईक याचा १६-२५, २५-६, २५-८ असा पराभव केला.यजमान आंध्र जिमच्या जगन्नाथ देवनपल्ली यानेही अटीतटीच्या झालेल्या सामन्यात पिछाडीवरुन बाजी मारताना अनंत गायत्रीचा ९-२५, २५-११, २५-९ असा पाडाव केला. यानंतर एफसीसीच्या अक्षय कांबळे याने पहिला गेम गमावल्यानंतर दमदार पुनरागमन करताना सलग दोन गेम जिंकताना शिवतारा संघाच्या स्वप्नील गोलतरकचे कडवे आव्हान १४-१२, २५-५, २०-१३ असे परतावले. (क्रीडा प्रतिनिधी)इतर निकालयोगेश घोंगडे (जैन इरिगेशन) वि.वि. जगदीश पवार (बीएमसी) २५-४, २५-१२; फैझन अन्सारी (शिवतार) वि.वि. संदीप जोगळे (बीईएसटी) २५-०, २५-०; मोहम्मद साजीद (जैन इरिगेशन) वि.वि. प्रशांत मोरे (रिझर्व्ह बँक) १२-२५, २५-०, २५-१७.
महापालिकेच्या विकासचा धक्कादायक विजय
By admin | Updated: November 3, 2015 01:56 IST