Join us  

धक्कादायक! मुंबईत अॅक्सिस बँक लुटण्यासाठी चहावाला लपून राहिला शौचालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 5:58 PM

नवी मुंबईत भुयार खोदून  बँक लुटल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतही बँक लुटण्यासाठी चोराने अशाच प्रकारचा चक्रावून टाकणारा मार्ग अवलंबल्याची एक घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देबँकेतील कर्मचा-यांना चहा देण्यासाठी विकास नियमितपणे जुहू शाखेमध्ये यायचा. तिथून निघण्यापूर्वी त्याने मॅनेजरचा निरोप घेतोय असे दाखवले व लगेच लक्ष चुकवून वॉशरुममध्ये शिरला.

मुंबई -  नवी मुंबईत भुयार खोदून  बँक लुटल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतही बँक लुटण्यासाठी चोराने अशाच प्रकारचा चक्रावून टाकणारा मार्ग अवलंबल्याची एक घटना समोर आली आहे. जुहू येथील अॅक्सिस बँकेच्या शाखेमध्ये लुटमार करण्यासाठी चोर चक्क दिवसभर बँकेच्या शौचालयामध्ये लपून राहिला होता. सुदैवाने चोराचा बँक लुटण्याचा प्रयत्न फसला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विकास चव्हाणला बेडया ठोकल्या असून तो बँकेमध्ये चहा देण्याचे काम करायचा. त्यामुळे त्याला बँकेचा कोपरा ना कोपरा माहिती होता असे अॅक्सिस बँकेकडून सांगण्यात आले. 

बँकेतील कर्मचा-यांना चहा देण्यासाठी विकास नियमितपणे जुहू शाखेमध्ये यायचा. शुक्रवारी पँट्री मॅनेजरला भेटण्याच्या निमित्ताने विकास चव्हाण बँकेत आला होता. तिथून निघण्यापूर्वी त्याने मॅनेजरचा निरोप घेतोय असे दाखवले व लगेच लक्ष चुकवून वॉशरुममध्ये शिरला. वॉशरुममधल्या कपाटात तो रात्री 9.30 वाजेपर्यंत लपून बसबला होता. रात्रीपर्यंत बँकेत काही कर्मचारी काम करत असतात याची त्याला माहिती होती. 

बँकेतून सर्व कर्मचारी निघून गेल्यानंतर तो बाहेर आला व त्याने ड्रॉवरच्या चाव्या मिळवल्या. त्याने बँकेची तिजोरी, कॅश डिपॉझिट मशीन उघडण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला यश मिळाले नाही. त्यामुळे तो निराश झाला असे पोलिसांनी सांगितले. त्याच्या या सर्व हालचाली बँकेतील सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये कैद झाल्या. दुस-या दिवशी सकाळी जेव्हा बँकेच्या सुरक्षारक्षकाने बँक उघडली तेव्हा लुटमारीचा हा प्रकार समोर आला. 

सुरक्षारक्षकाने लगेच बँकेच्या मॅनेजरला घडल्या प्रकाराची माहिती दिली. काही ड्रॉवरर्स उघडे होते.  जमिनीवर चाव्या पडलेल्या होत्या. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी आरोपीचे रेखाचित्र तयार केले. चव्हाणच्या मोबाइल फोनचे लोकेशनही त्यावेळी बँकेत दिसत होते. तक्रार दाखल झाल्यानंतर सहातासांच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक करुन  बेडया ठोकल्या. पँट्रीच्या खिडकीमधून विकास चव्हाण निसटला. 

 

टॅग्स :बँक