Join us  

धक्कादायक! २८५ कोटींची संपत्ती हडपण्यासाठी दिवंगत आईला दाखविले हयात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 6:11 AM

मुंबईतील व्यक्तीची बनवाबनवी : पत्नी, मुलासह नॉयडा पोलिसांनी केली अटक

मुंबई : संपत्तीसाठी कौटुंबीक कलह नवीन नाही. प्रसंगी एखाद्याचा खूनही करण्याच्या अमानुष घटना घडतात. मुंबईतील एका व्यक्तीने संपत्ती हडपण्यासाठी सात वर्षांपूर्वी स्वर्गवासी झालेल्या आईला कागदोपत्री जिवंत दाखवून सख्ख्या भावालाच फसवले. धाकट्या भावाने पोलीस आणि कोर्टात तक्रार करून थोरला भाऊ सुनील गुप्ताविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीवरून सूरजपूर जिल्हा न्यायालयाने विजय गुप्ताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नॉयडा पोलिसांनी सुनील गुप्ता, त्याची पत्नी राधा आणि मुलगा अभिषेक यांना सोमवारी सायंकाळी नवी मुंबईस्थित घरातून अटक केली.

बनावट बक्षिसपत्र तयार करून आईच्या नावे असलेली २८५ कोटींची संपत्ती भावाने हडप केल्याचा विजय गुप्ताचा आरोप आहे.या बक्षिसपत्रावर सही करणाऱ्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. विजय गुप्ताच्या तक्रारीवरून भादंविच्या विविध कलामांन्वये फसवणूक, बनवेगिरी, गुन्ह्याच्या कटाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुप्ता बंधूंचा मेणबत्ती तयार करण्याचा कारखाना आहे. विजय गुुप्ताने तक्रारीत नमूद केले की, ७ मार्च २०११ रोजी आमच्या आईचे मुंबईत निधन झाले. तथापि, माझा थोरला भाऊ सुनील गुप्ता याने १४ मार्च २०११ रोजी मुंबईतील उपनिबंधक कार्यालयात एक प्रतिज्ञापत्र सादर करून आमची आई हयात असल्याचे दाखवून तिची संपत्ती, दागदागिने, म्युच्युल फंड आदी त्याच्या आणि स्वत:च्या कुटुंबियांच्या नावे केली. त्याने प्रतिज्ञापत्रात जे दोन साक्षीदार नमूद केले आहेत, ते दोघेही माझ्या आईच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते. दोन्ही भाऊ कंपनीत समान भागीदार असून, त्यांच्या कंपनीची दोन कार्यालये आहेत. मुंबईतील कार्यालय सुनील, तर नॉयडातील सेक्टर १५-ए येथील कार्यालय विजय सांभाळतो. सुनीलने कंपनीच्या खात्यातील रक्कम मित्राच्या नावे वळती केली होती. एवढेच नाहीतर खोटे बिल द्यायचा. परिणामी कंपनीचे मोठे नुकसान झाले, असे विजय गुप्ताने तक्रारीत नमूद केले आहे.भावाला जीवे मारण्याची धमकी२२ आॅक्टोबर रोजी तीन व्यक्तींनी मला नॉयडातील कार्यालयात मारहाण करून जिवे मारण्याची धमकीही दिली होती. भावानेच हे गुंड पाठविले होते, असा आरोपही विजयने केला आहे. सुनील गुप्ता, त्याची पत्नी राधा आणि मुलगा अभिषेक यांना अटक करण्यात आली असून, त्यांना नॉयडाला नेण्यात येईल. तेथे दंडाधिकाºयांसमक्ष हजर केल्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात केली जाईल, असे सेक्टर-२० पोलीस ठाण्याचे मनोजकुमार पंत यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई