Join us

माळढोक पक्षांना वीजवाहिन्यांचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:06 IST

अनेक पक्षांचा मृत्यू : भूमिगत वीज वाहिन्या घालण्याची मागणीसचिन लुंगसेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जमिनीवरून जाणाऱ्या वीज ...

अनेक पक्षांचा मृत्यू : भूमिगत वीज वाहिन्या घालण्याची मागणी

सचिन लुंगसे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जमिनीवरून जाणाऱ्या वीज वाहिन्यांचा शॉक लागून माळढोक पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याचे समोर आल्यानंतर अतिसंकटग्रस्त यादीत समाविष्ट असलेल्या या पक्ष्याच्या संवर्धनासह संरक्षणासाठी जमिनीखालून वीज वाहिन्या घालण्यात याव्यात, अशी री तज्ज्ञांनी ओढली आहे. तसेच माळढोकच्या संवर्धनासाठी कृती कार्यक्रम सरकारने हाती घ्यावा, या प्रमुख मुद्यावर तज्ज्ञांनी जोर दिला आहे.

महाराष्ट्रात माळढोक सोलापूर व चंद्रपूर जिल्ह्यात आढळतात. २०११ साली झालेल्या नोंदीनुसार महाराष्ट्रात २५ ते ३० माळढोक होते. २०१३ मध्ये ही नोंद १३ झाली. त्यानुसार, सोलापुरात ५ तर चंद्रपुरात ८ माळढोक आढळले. दोन वर्षांत माळढोकची संख्या दोन एकने घटली. २०१७ साली झालेल्या सर्वेक्षणात माळढोकची नोंदच झाली नाही. पण सोलापूरला २०२० मध्ये एक पक्षी आढळून आला. २०१७ साली झालेल्या सर्वेक्षणानुसार, एकही माळढोकची नोंद झाली नसल्याने त्यास जैविकदृृष्ट्या मृत असे संबोधले होते. तर देशात २०११ च्या सर्वेक्षणानुसार माळढोकची संख्या २५० होती. आजच्या क्षणी देशात माळढोकची संख्या सुमारे १५० आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त राजस्थानात माळढोक आढळतात. येथे माळढोकची संख्या सुमारे १०० आहे. गुजरातमध्ये १०, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात १० माळढोक आहेत.

माळढोक पक्षी वजनी असून तो खूप उंचीवर उडत नाही. ज्या वीज वाहिन्या खाली असतात, अशा वीज वाहिन्या या पक्ष्यास अडचणीच्या ठरतात. माळढोक एक मीटर म्हणजे तीन फूट उंचीचा असतो. वीज वाहिन्या जमिनीपासून दहा ते पंधरा मीटर उंचीवर असतात. माळढोक जेव्हा उडतो तेव्हा तो विजेच्या तारांवर जाऊ शकतो किंवा त्यावर तो आदळू शकतो, असे माळढोकच्या संवर्धनासह संरक्षणासाठी काम करत असलेले प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले. पुनरुज्जीवन कार्यक्रम राबविला पाहिजे. अन्यथा येत्या काळात आहे तो माळढोकदेखील नामशेष होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

-------------

माळढोक नामशेष होण्यामागची कारणे

उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांमुळे माळढोकला हानी पोहचते. तर गवताळ प्रदेशात त्यांची अंडी फोडली जातात. तसेच माळढोकची शिकार केली जाते.

--------------

असे होईल संरक्षण

माळढोक स्थानिक परिसरात स्थलांतरित होत असतो. त्याच्या संवर्धनासाठी त्याचा अधिवास सुरक्षित केला पाहिजे.

जमिनीखालून जाणाऱ्या वीज वाहिन्या तीन, चार फूट खाली असाव्यात. वीज वाहिन्यांना तीन ते चार इंच रबरी आवरण आवश्यक आहे.

ज्या वीज वाहिन्या जमिनीवरून जात आहेत त्यास रबर आवरण घातल्यास माळढोकला हानी पोहचणार नाही.