Join us

शोभा कामतचा आयेशाला धक्का

By admin | Updated: June 22, 2015 02:21 IST

महिला गटातील वयस्क खेळाडू व माजी राष्ट्रीय विजेत्या कोल्हापूरच्या शोभा कामतने सनसनाटी निकाल लावताना बलाढ्य आयेशा मोहंमदचा

मुंबई : महिला गटातील वयस्क खेळाडू व माजी राष्ट्रीय विजेत्या कोल्हापूरच्या शोभा कामतने सनसनाटी निकाल लावताना बलाढ्य आयेशा मोहंमदचा २-० असा धुव्वा उडवला. या धमाकेदार विजयासह शोभाने राज्य नामांकन कॅरम स्पर्धेच्या महिला एकेरी गटात शानदार आगेकूच केली. त्याचवेळी यानंतर शोभाने हाच धडाका कायम ठेवताना उपांत्य फेरी गाठून सर्वांनाच धोक्याचा इशारा दिला.नरसोबाची वाडी (कोल्हापूर) येथे श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रथम शोभाने सार्क विजेत्या व विद्यमान राष्ट्रीय विजेती आयेशाचा २५-११, २५-१८ असा सरळ दोन गेममध्ये धुव्वा उडवला. यानंतर शोभाने हा विजय फ्ल्यूक नसल्याचे सिद्ध करताना ठाण्याच्या मीनल लेलेचे कडवे आव्हान १०-१५, २५-९, २५-१५ असे परतावून दिमाखात उपांत्य फेरी गाठली. मुंबईच्या संभाव्य विजेत्या प्रीती खेडेकरनेदेखील तीन गेमपर्यंतर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात बाजी मारताना पुण्याच्या मेघा मठकरीला २५-२१, १२-२५, २५-१८ असे नमवले आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. तसेच आसावरी जाधव (पालघर) आणि कसलेल्या मैत्रेयी गोगटे (रत्नागिरी) यांनीदेखील तीन गेमपर्यंत रंगलेल्या सामन्यात २-१ अशी झुंजार बाजी मारताना अनुक्रमे स्नेहा मोरे (मुंबई उपनगर) व नेत्रा चुनेकर यांचा पाडाव केला.पुरुष एकेरी गटात मुंबईकर खेळाडूंचे वर्चस्व राहिले. बलाढ्य पंकज पवारने मुंबईच्याच दिलीप सोसाला २५-१२, २५-५ असे नमवून उपांत्य फेरी निश्चित केली. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या रियाझ अकबर अलीनेदेखील विजयी घोडदौड कायम राखताना पुण्याच्या अनिल मुंढेला २५-११, २५-६ असे लोळवत उपांत्य फेरी गाठली. तर योगेश घोंगडेनेदेखील उपांत्य फेरीतील जागा निश्चित करताना पुण्याच्या वसंत वैराळचे आव्हान १३-२५, २५-२२, २५-४ असे संपुष्टात आणले. अन्य एका सामन्यात पुण्याच्या योगेश परदेशीने सहज विजय मिळवताना मुंबई उपनगरच्या सुरेख पंडितचा २५-४, २५-० असा धुव्वा उडवला.