Join us

कफ परेडच्या समुद्रात उद्यान, सल्लागाराच्या नियुक्तीलाही शिवसेनेचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 06:10 IST

कफ परेडच्या समुद्रात भराव टाकून उद्यान साकारण्याच्या प्रस्तावास बुधवारी स्थायी समितीत विरोधकांनी विरोध केला.

मुंबई : कफ परेडच्या समुद्रात भराव टाकून उद्यान साकारण्याच्या प्रस्तावास बुधवारी स्थायी समितीत विरोधकांनी विरोध केला. मात्र, एमएमआरडीएच्या अखत्यारितील उद्यानाच्या प्रस्तावास बुधवारी शिवसेनेने पाठिंबा दिला. परिणामी, हा प्रस्ताव मंजूर झाला.कफ परेड येथील समुद्रात भराव टाकून उद्यान साकारण्यात येणार असून, याकरिता सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव पालिकेच्या बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला. राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी विरोध केला. भरावामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल व मुंबईस धोका होईल. भरावासाठी मेट्रोच्या कामातून निघणारी माती वापरली जाणार आहे. ती ज्या ठिकाणी डोंगर पोखरले आहेत, तिथे नेऊन टाकावी, असेही त्या म्हणाल्या.विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही उद्यानाकरिता एमएमआरडीएला सल्लागार नेमू दे, असे म्हणत, याबाबत पालिकेने खर्च का करावा, असा सवाल केला. भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी १९९० साली बॅकबे रेक्लेमेशन करण्याचे ठरविले असल्याचे म्हणत, तेव्हा ते आरक्षण कोणी केले याची माहिती घेण्याची गरज असल्याचे म्हणणे मांडले. त्यानंतर मात्र, या प्रस्तावास शिवसेनेने पाठिंबा दिल्याने, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा प्रस्ताव मंजूर केला.