Join us

शिवसेनेचा बुलंद भगवा बुरूज हरपला

By admin | Updated: October 15, 2014 23:33 IST

साबीरभाई शेख यांच्या कालवशतेमुळे शिवसेनेचा ठाण्याचा भगवा बुरूज हरपला आहे. त्यांचा बुलंद आणि ढगांच्या गडगडाटासारखा असणारा आवाज ठाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक शिवसैनिकाच्या कानांत आजही दणाणतो आहे.

ठाणे : साबीरभाई शेख यांच्या कालवशतेमुळे शिवसेनेचा ठाण्याचा भगवा बुरूज हरपला आहे. त्यांचा बुलंद आणि ढगांच्या गडगडाटासारखा असणारा आवाज ठाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक शिवसैनिकाच्या कानांत आजही दणाणतो आहे. मूळचे नारायणगावचे असलेले साबीरभाई आपले आयुष्य घडविण्यासाठी मुंबईत आलेत. त्यांची अशाच एका मंगलक्षणी शिवसेनाप्रमुखांशी गाठभेट झाली आणि त्यांचे जे गुरुशिष्याचे नाते जुळले, ते अखेरपर्यंत कायम राहिले. कोणत्याही राजकीय पक्षात आपले स्थान टिकवायचे म्हणजे पाडापाडीचे आणि खेचाखेचीचे राजकारण नेत्यांना करावे लागते. त्याला शिवसेनाही अपवाद नव्हती, परंतु १४ नेत्यांच्या प्रभावळीत आपली तटस्थता आणि निर्लेपता राखूनही शिवसेनाप्रमुखांच्या अत्यंत विश्वासातले नेते असे स्थान साडेतीन दशके टिकवून ठेवणारे साबीरभाई एकमेव नेते होते. ते मूळचे पहिलवान, परंतु नंतर शिवसैनिक झाले. मैदानी खेळाची आवड आणि रांगडे व्यक्तिमत्त्व व बुलंद आवाज, वाढलेली दाढी त्यांची ही सगळी वैशिष्ट्ये लढाऊ शिवसेनेला एकदम अनुरूप ठरली. शिवचरित्राचा आणि महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांचा गाढा व्यासंग, त्याला हिंदू-मुस्लिम धर्मांतल्या अध्यात्माची दिलेली जोड व राजकारण आणि समाजकारणाच्या संदर्भांची त्यांना दिलेली चुरचुरीत फोडणी, यामुळे त्यांची सगळीच भाषणे अत्यंत श्रवणीय अशी होत असत. प्रचारसभांमधली त्यांची भाषणे शिवसैनिकांना आणि मतदारांना पेटवून काढणारा अंगार ठरत असत. शिवसेना ही मुस्लिमविरोधी आहे, या सगळ्या विरोधी पक्षांच्या प्रचाराची धार बोथट करून टाकणारे एकमेव अस्त्र शिवसेनेकडे होते, ते म्हणजे साबीरभाई... त्यामुळेच १९७५ मध्ये जेव्हा कल्याणमध्ये पहिल्या आणि शेवटच्या थेट निवडणुकीने नगराध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक झाली त्या वेळी शिवसेनेने साबीरभार्इंना उमेदवारी दिली होती. त्या वेळच्या जनसंघाचे भगवानराव जोशी आणि शिवसेनेचे साबीरभाई अशी लढत झाली असता थेट निवडणुकीत त्यांचा अवघ्या ३०० मतांनी पराभव झाला होता. सतीश प्रधान हे ठाण्याचे पहिले जिल्हाप्रमुख. त्यांच्यानंतर ठाणे जिल्हाप्रमुखपदाची धुरा साबीरभाईंनीच सांभाळली, ती त्यांचा उत्तराधिकारी आनंद दिघे यांच्या रूपाने मिळेपर्यंत. सेनेमधील कोणताही गट, तट यांचे राजकारण न करता त्यांनी आपली वाटचाल केली. मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात ते कामगारमंत्री होते. परंतु, हे पद जनतेच्या सेवेसाठी आहे आणि त्यासाठीच मी ते वापरणार, अशा निर्लेपतेने त्यांनी ते वापरले. त्यामुळेच साडेतीन दशके नेता, १५ वर्षे आमदार आणि साडेचार वर्षे कॅबिनेट मंत्री अशी सत्ता त्यांना मिळाली, तरी त्यांनी स्वत:साठी कधीही पैसा गाठीला बांधला नाही. शिवसेनेतील छोटे-छोटे कार्यकर्ते आणि पदाधिकारी करोडोपती झाले, परंतु साबीरभाई इतक्या साधेपणाने वावरले की, त्यांच्या उतारवयात त्यांना विपन्नावस्था पाहण्याची वेळ आली. तेव्हाही त्यांची काहीशी उपेक्षा झाली. ज्यांनी आपल्या हयातीतली उणीपुरी ४० वर्षे ज्या शिवसेनेला दिली, त्या शिवसेनेच्या पुढील पिढीने आपल्या या भगव्या शिलेदाराची पुरेशी काळजी घेतली नाही. तशातच त्यांच्या पत्नीचे अलीकडे निधन झाले होते. त्यानंतर, त्यांची प्रकृती खालावतच गेली व बुधवारी त्यांनी या जगाला अखेरचा अलविदा केला.