महाड : विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे भरत गोगावले यांनी सलग दुसऱ्यांदा विजय संपादन केल्यामुळे या मतदार संघात शिवसेना अभेद्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आमदार गोगावले यांनी काँग्रेसच्या माणिक जगताप यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराचा तब्बल २१ हजार मतांनी पराभव केला.या मतदारसंघात समावेश असलेल्या माणगावमधील निजामपूर लोणेरे आणि लाखपाले जि.प. मतदारसंघात राष्ट्रवादीचे सदस्य आहेत. मात्र या तीनही मतदारसंघातदेखील आंबोणकर यांना मतदारांचा कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले. मनसे, भाजपा उमेदवारांचीही तशीच परिस्थिती राहिली. राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व भाजपाच्या मतदारांनीही आपली मते शिवसेनेच्या गोगावले यांच्या पारड्यात टाकल्याचे मतांच्या आकडेवारीवरुन स्पष्ट दिसून येत आहे. पाच वर्षात मतदारसंघात म्हणावी तशी विकासकामे झालीच नाहीत. आजही ग्रामीण भागातील अनेक गावे रस्ता, पाणी आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. मात्र या विकासकामांचा कुठलाही विपरीत परिणाम गोगावले यांच्या मतांवर झाल्याचे दिसून येत आहे. गोगावले यांनी ठेवलेला दांडगा जनसंपर्क तसेच कार्यकर्त्यांसह सामान्यांशी जुळलेली नाळ विजयास फायदेशीर ठरली.
महाडमध्ये शिवसेना अभेद्य!
By admin | Updated: October 20, 2014 22:55 IST