Join us
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदानाच्या महायज्ञाला शिवडीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:06 IST

मुंबई : ‘लोकमत’तर्फे स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘नातं रक्ताचं’ या ...

मुंबई : ‘लोकमत’तर्फे स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘नातं रक्ताचं’ या रक्तदानाच्या महायज्ञाला शिवडीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कच्छ युवक संघाच्या वतीने शिवडी येथील शिवडी नाका येथे रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी विविध संस्थांच्या प्रतिनिधींसह नागरिकांनी असे मिळून एकूण २६ रक्तदात्यांनी रक्तदान करून ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ असा संदेश दिला.

रक्ताचा तुटवडा भासू नये, यासाठी नागरिकांनी या रक्तदानाच्या महायज्ञात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन या शिबिराच्या वेळी आयोजकांतर्फे करण्यात आले. या शिबिरात तरुणांपासून ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. या वेळी कच्छ युवक संघाचे अनुप शेठीया, हसमुख ललन, अनिल शेठीया, भारत छेडा, रोमिल गोगरे, रश्मीबेन गड्डा उपस्थित होते. कच्छ युवक संघाच्या वतीने दर चार महिन्यांनी मुंबई महानगर क्षेत्रात रक्तदान शिबिर घेण्यात येते. चर्चगेट ते विरार, सीएसएमटी ते कल्याण, सीएसएमटी ते पनवेल, अलिबागपर्यंत ही शिबिरे आयोजित केली जातात.

आम्ही आतापर्यंत एक लाख ८० हजार बाटल्या रक्त गोळा केले आहे. रक्ताची गरज असेल त्याला ते उपलब्ध होते. कोरोना काळातही आमचे दाते रक्तदानासाठी पुढे येत आहेत. ‘लोकमत’च्या माध्यमातून या उपक्रमाला गती मिळाली आहे.

- भारत गोगरी, उपाध्यक्ष, शिवडी कच्छ युवक संघ