Join us  

लोकसभेचे ‘बॅटल ग्राउंड’ शिवाजी पार्क; प्रचारसभांसाठी ठाकरे गट, भाजप आणि अजित पवार गटाचे अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 7:34 AM

शिवसेनेच्या ठाकरे गटाने १७ मे  रोजीच्या प्रचारसभेसाठी अर्ज केल्याचे समजते.

मुंबई : महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाची बोलणी सुरू असली, तरी प्रचारसभांसाठी शिवाजी पार्कच्या मैदानासाठी सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने यासाठी अर्ज केले. शिवसेनेच्या ठाकरे गटाने १७ मे  रोजीच्या प्रचारसभेसाठी अर्ज केल्याचे समजते.

महापालिकेच्या जी-दक्षिण विभाग कार्यालयाकडे एकूण सहा अर्ज आल्याचे समजते. मनसेने गुढीपाडवा मेळाव्यासाठी अर्ज केला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने अजून तरी शिवाजी पार्कसाठी अर्ज केला नसल्याचे समजते. कोणत्या पक्षाचे कोणत्या तारखेसाठी, किती अर्ज आले, ही माहिती देताना जी-दक्षिण  विभाग कार्यालयाकडून कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे. 

दसरा मेळाव्यासाठी आताच अर्जऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटाने आताच अर्ज केल्याचे कळते. शिवसेनेतील फुटीनंतर शिवाजी पार्कसाठी शिंदे आणि ठाकरे गटात संघर्ष सुरू आहे. दोन वर्षांत ठाकरे गटाचाच दसरा मेळावा शिवाजी पार्कात होत आहे, तर शिंदे गटाने वांद्रे- कुर्ला संकुलात मेळावा घेतला आहे.

दोन अर्जांची चर्चा आणि...१७ मे रोजी ठाकरे गट तसेच मनसेनेही प्रचारसभेसाठी अर्ज केल्याची चर्चा दिवसभर होती.  यावर मनसेचे नितीन सरदेसाई म्हणाले, आम्ही फक्त गुढीपाडवा मेळाव्यासाठी अर्ज केला आहे, असे त्यांनी सांगितले, तर शिंदे गटाचे आ. सदा सरवणकर यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही अद्याप मैदानासाठी अर्ज केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आणखी तारखांसाठी अर्ज अपेक्षितशिवाजी पार्कसाठी सध्या तरी सहा अर्ज आले आहेत. जागावाटप झाल्यानंतर  उमेदवारांचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर राजकीय पक्षांकडून आणखी अर्ज येण्याची शक्यता आहे.  महाविकास आघाडी आणि महायुतीच्या  एकत्रित सभा होतील. त्यामुळे त्यांच्याकडून आणखी तारखांसाठी अर्ज येऊ शकतात.

काँग्रेसने अर्ज केला का? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने अजून अर्ज केलेला नाही, अशी माहिती आहे. बहुधा ठाकरे गटाला १७ मे रोजी मैदान मिळाल्यास याच दिवशी महाविकास आघाडीची एकत्रित सभा शिवाजी पार्कवर होईल, अशी शक्यता आहे.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४