मुंबई :- समस्त मुंबईकरांची शान असलेले तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना प्रिय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात पसरलेल्या धुळीच्या साम्राज्यावर अजूनही पालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना केली नसल्याचा मनसेने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
मनसेने आज पालिकेच्या जी/उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्ताना जाब विचारण्यासाठी आंदोलन केले .मनसेचे उपाध्यक्ष व माहीम विधानासभा विभाग अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पालिका कार्यालया बाहेर कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी शिवाजीपार्क मैदानातील माती मडक्यातून सहाय्यक आयुक्तांना देण्यात आली.
परिसरातील ज्येष्ठ नागरिक हितगुज करण्यासाठी फेरफटका मारण्यासाठी शिवाजी पार्क येथे येतात, लहान मुले बगीच्यात खेळण्यासाठी येतात सकाळ पासूनच मैदानावरील धूळ उडत असल्याने इथे येणाऱ्या प्रत्येकाला या धुळीचा सामना करावा लागतो.
याठिकाणी हिरवळ व्हावी यासाठी लाल माती टाकण्यात आली मात्र हवेतून ही धूळ नागरिकांच्या नका तोंडात, घरात गेली इथली झाडे, इमारती या लाल मातीने माखली गेली.
तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार याठिकाणी 250 ट्रक लाल माती टाकली खरी पण याच धुळीचा त्रास आता इथल्या रहिवाशांना सहन करावा लागत असल्याचे यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.
सुरुवातीला रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प मनसेने स्व खर्चातून केला होता. त्याठिकाणी स्प्रिंकलर देखभाल करणे हे पालिकेने हाती घेतले होते.तसेच 35 विहिरी याठिकाणी बांधल्या त्याचे पाणी कधी शिंपडले गेलेच नाही. त्यामुळे करोडो रुपयांचा जो खर्च केला गेला तो मातीतच गेला असा आरोप त्यांनी केला.
तर आय आय टीच्या अहवाला नंतर यावर कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतील त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आश्वासन सहाय्यक आयुक्तानी दिल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.
यावर येत्या महिन्याभरात उपाययोजना केली गेली नाही तर आम्ही मैदानातील माती पालिकेच्या कार्यालया समोर आणून टाकू असा इशारा किल्लेदार यांनी दिला आहे.