Join us

नालेसफाईवरून शिवसेना अडचणीत

By admin | Updated: June 23, 2015 01:17 IST

पहिल्या पावसात मुंबईची दाणादाण उडाल्यानंतरही नालेसफाईची पाठराखण करणाऱ्या शिवसेनेला मित्रपक्षानेच अडचणीत आणण्याचे मनसुबे आखले आहेत़

मुंबई : पहिल्या पावसात मुंबईची दाणादाण उडाल्यानंतरही नालेसफाईची पाठराखण करणाऱ्या शिवसेनेला मित्रपक्षानेच अडचणीत आणण्याचे मनसुबे आखले आहेत़ नालेसफाईच्या चौकशीस टाळाटाळ केल्यास राज्य सरकारकडेच दाद मागू, असा गर्भित इशारा भाजपाने दिला आहे़ आरोग्य आणि मालमत्ता कर आकारणीवर श्वेतपत्रिका काढून शिवसेनेच्या कारभारालाच आव्हान देण्याची तयारीही भाजपाने सुरू केली आहे़सन २०१५ ते २०१७ या दोन वर्षांकरिता नालेसफाई व मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी २८५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत़ तीन महिने विलंबाने सुरू झालेल्या नालेसफाईला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाहणी दौऱ्यातून प्रशस्तिपत्रकही दिले होते़ मात्र नालेसफाईच्या नावाखाली ठेकेदार हातसफाई करीत असल्याचा आरोप काँग्रेस व भाजपाने त्या वेळेस केला होता़ शुक्रवारी कोसळलेल्या पहिल्याच मुसळधार पावसात नालेसफाईचा पर्दाफाश झाला़ या प्रकरणी विरोधी पक्षांनी सत्ताधारी शिवसेनेला पालिकेच्या महासभेत आज धारेवर धरले़ ही संधी साधून भाजपानेही आज अप्रत्यक्ष शिवसेनेवर निशाणा साधला़ ठेकेदार, डम्पिंग ग्राउंड आणि वजनकाटे वापरणाऱ्यांचे त्रिकूट असल्याचे भाजपाने निदर्शनास आणले होते़ त्यानंतरही नालेसफाईकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली़ त्यामुळे या प्रकरणाची पालिका स्तरावर चौकशी करावी़ अन्यथा मुख्यमंत्र्यांमार्फतच चौकशी लावून घेऊ, असा इशारा भाजपाचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड़ आशिष शेलार यांनी दिला़ (प्रतिनिधी)