Join us

पोटनिवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व

By admin | Updated: January 20, 2015 02:04 IST

महानगरपालिकेत पाच प्रभागांत झालेल्या पोटनिवडणुकीत तीन जागा शिवसेनेने, तर दोन राष्ट्रवादीने जिंकल्या. वागळे इस्टेट येथील तीनही प्रभागांत भगवा फडकला,

ठाणे : महानगरपालिकेत पाच प्रभागांत झालेल्या पोटनिवडणुकीत तीन जागा शिवसेनेने, तर दोन राष्ट्रवादीने जिंकल्या. वागळे इस्टेट येथील तीनही प्रभागांत भगवा फडकला, तर मुंब्य्रात दोन ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. प्रभाग ३४-अ आणि ब मध्ये फाटक दाम्पत्य विजयी झाले. प्रभाग क्रमांक १३ अ मध्ये शिवसेनेच्या कांचन चिंदरकर आणि मुंब्य्रातील ६१ -अ आणि ६३ अ मध्ये राष्ट्रवादीचे साजीद अन्सारी आणि हसीना साजीद शेख हे विजयी झाले आहेत. यामुळे एकूणच वागळेत शिवसेनेच्या तीन जागा वाढल्या आहेत. आता महापालिकेतील शिवसेनेचे संख्याबळ ५३ वरून ५६ झाले आहे. तर राष्ट्रवादीच्या पूर्वी होत्या तेवढ्याच जागा असून, काँग्रेसचे संख्याबळ मात्र तीनने कमी झाले आहे.प्रभाग ३४ अ मधून शिवसेनेच्या जयश्री फाटक, काँग्रेसच्या ललिता टाकळकर आणि लोकजनशक्ती पार्टीच्या उषा डुंगरसी या उभ्या होत्या. फाटक यांना ५१८३ मते मिळाली. तर ललिता टाकळकर यांना १७७३ मते मिळाल्याने त्यांचा ३,४१० मतांनी दणदणीत पराभव झाला. तर डुंगरसी यांना अवघी ११७ मते मिळाली. १११ जणांनी नकाराधिकार वापला. दुसरीकडे ३४ ब मध्ये रवींद्र फाटक यांनी काँग्रेसचे अभिजित पांचाळ यांचा ३२०५ मतांनी पराभव केला. फाटक यांना ५१०९ मते मिळाली, तर पांचाळ यांना १९०४ मते मिळाली. लोकजनशक्ती पार्टीचे दीपक पिटकर यांना अवघी ५३ मते मिळाली. दरम्यान, प्रभाग क्रमांक १३ अ मध्ये शिवसेनेच्या कांचन चिंदरकर यांनी काँग्रेसच्या शीतल चव्हाण यांचा ३,८५८ मतांनी पराभव केला. चिंदरकर यांना ५,१२१ तर चव्हाण यांना १,२६३ मते मिळाली. अपक्ष शहरूनिसा मकबुल खान यांना ४९ मते मिळाली.मुंब्य्रातील प्रभाग ६१ अ मध्ये राष्ट्रवादीचे साजीद अन्सारी यांनी समाजवादी पक्षाचे नफीस अन्सारी यांचा १,१३९ मतांनी पराभव केला. साजीद अन्सारी यांना २,५८६ तर नफीस अन्सारी यांना १,४४७ मते मिळाली. तसेच प्रभाग क्रमांक ६३ अ मध्ये राष्ट्रवादीच्या हसीना अजीद शेख यांनी समाजवादीच्या फरहा शहा यांचा १,६४९ मतांनी पराभव केला. हसीना शेख यांना २,६४२ आणि फरहा शहा यांना ९९३ मते मिळाली. उल्हासनगरात प्रभाग १३ मध्ये राष्ट्रवादीच्या रेखा ठाकूर यांनी भाजपाच्या रिजवानी यांचा ९४५ मतांनी पराभव केला. ठाकूर यांना २,३६२, तर रिजवानी यांना १,४१७ मते मिळाली. च्भार्इंदरच्या प्रभाग क्र. २ ‘ब’ या जागेसाठी रविवारी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचे रवि व्यास २,४७६ मतांनी विजयी झाले. त्यांनी जनता दलचे (से) मिलन म्हात्रे यांचा पराभव केला आहे. व्यास यांनी ३ हजार ५६५ मते मिळविली. म्हात्रे यांना १ हजार ८९, राष्ट्रवादीचे चारू आयतोडा यांना ६९०, तर बहुजन विकास आघाडीचे हिरेंद्र शाह यांना ८९ इतकी अत्यल्प मते मिळाली. ८२ मतदारांनी नोटा पर्याय स्वीकारला. च्२०१२ रोजी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत व्यास यांनी प्रभाग क्र. २ ब मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय संपादन केला होता. त्या वेळी प्रभाग रचनेनुसार एका प्रभागात दोन नगरसेवक याप्रमाणे त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे माजी आ. गिल्बर्ट मेंडोन्सा यांची कन्या असेन्ला परेरा निवडून आल्या होत्या. पुढे मेंडोन्सा यांच्या घराणेशाहीचा वाढता अडसर डोकेदुखी ठरू लागल्याने व्यास यांनी भाजपाचा आधार घेत नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या प्रभागात पोटनिवडणूक जाहीर झाली होती. च्या प्रभागात व्यास यांच्यासह असेन्ला यांना मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे खरी लढत व्यास व राष्ट्रवादीत होण्याची चिन्हे होती. मात्र राष्ट्रवादीने दिलेला उमेदवार प्रभावशाली नसल्याने ऐन मतदानाच्या पूर्वसंध्येला मेंडोन्सा यांना नेहमीच पाण्यात पाहणारे म्हात्रे यांनी राष्ट्रवादीसोबत तडजोड केली. च्यानंतर, राष्ट्रवादीने स्वउमेदवाराखेरीज म्हात्रे यांचा प्रचार करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे मतदारांत संभ्रम निर्माण झाला होता. तसेच राष्ट्रवादीच्या गोटातही अस्वस्थता पसरल्याने व्यास यांच्या विजयाची शक्यता निर्माण झाल्याचे विविध राजकीय मंडळींकडून सांगण्यात येत होते. अखेर, ही बाब खरी ठरून व्यास यांचा २ हजार ४७६ मतांनी विजय झाला.