Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे स्टार प्रचारक बाळासाहेबच

By admin | Updated: January 25, 2017 05:09 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरची मुंबई महापालिकेची ही पहिलीच निवडणूक.

गौरीशंकर घाळे/ मुंबईशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरची मुंबई महापालिकेची ही पहिलीच निवडणूक. एरव्ही बाळासाहेबांच्या भाषणांनी कामाला लागणाऱ्या शिवसैनिकांना यंदा मात्र त्याची उणीव भासणार आहे. शिवसैनिक आणि बाळासाहेब यांच्यात एक अतुट नाते होते. याच नात्याला साद घालण्याचे धोरण सध्या शिवसेनेच्या रणनीतीकारांनी स्वीकारले आहे. ‘साहेब, शिवसेना आणि करून दाखवितो’ या थीमवर शिवसेनेने नव्या प्रचारमोहिमेला सुरुवात केली आहे. या थीमवरील पोस्टर शिवसैनिकांमध्ये भलतेच लोकप्रिय झाले असून, शिवसेनेशी संबंधित ग्रुपवर या पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. शिवसेनेसाठी मुंबई महापालिकेतील सत्ता कायमच प्राधान्याचा विषय राहिला आहे. राज्यात सध्या १० महापालिका आणि २५ जिल्हा परिषदा निवडणुकांचा फड रंगला असला तरी शिवसेनेचे सारे लक्ष्य मुंबईभोवती केंद्रित झाले आहे. मुंबईनंतर आपसूकच ठाण्याचा नंबर लागतो. बाळासाहेबांच्या अनुपस्थितीत लढली जाणारी यंदाची पहिलीच महापालिका निवडणूक आहे. त्यातच गेली दोन दशके सत्तासोबत करणाऱ्या भाजपानेही स्वबळावर महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी जोर लावला आहे. विधानसभा निवडणुकीत मुंबईतून भाजपाचे सर्वाधिक १५ आमदार निवडून आल्याने त्यांनी तब्बल ११४ जागांवर दावा ठोकला आहे. या परिस्थितीत युती तुटली तर शिवसेनेचा मुख्य सामना हा भाजपाशीच होणार हे स्पष्ट झाले आहे. या नव्या आव्हानाला सामारे जाण्यासाठी शिवसेना पुन्हा एकदा बाळासाहेबांकडे वळली आहे. नव्या प्रचारमोहिमेच्या माध्यमातून शिवसैनिकांना साद घालण्यात येत आहे. ‘साहेबांच्या हृदयात शिवसैनिक! शिवसैनिकांच्या हृदयात साहेब’, ‘आपले साहेब, आपली शिवसेना आणि आपली मुंबई’, ‘शिवसेनाच जिंकणार’ असे संदेश लिहिलेले पोस्टर तयार करण्यात आले आहेत. मोठ्या कल्पकतेने बनविण्यात आलेले हे पोस्टर सध्या शिवसैनिकांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. बाळासाहेब, शिवसेना आणि मुंबई यांचे नाते अधोरेखित करून एकाचवेळी शिवसैनिक आणि सहानुभूतीदारांना जागे करण्याची शिवसेनेची नीती सध्या तरी यशस्वी झाल्याचे चित्र आहे.