Join us  

मनसेच्या कामाचं श्रेय लाटण्याचा शिवसेनेकडून केविलवाणा प्रयत्न - नितीन सरदेसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 4:22 PM

''शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांनी आज या कामाच्या सुशोभिकरणाच्या भूमिपूजनाचा घाट घालून ‘आयत्या बिळावर नागोबा’ ही आपली वृत्ती कायम असल्याचे दाखवून दिले आहे'', अशी टीका मनसेचे नेते आणि दादर-माहीमचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी केला आहे.  

मुंबई : शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या दादरमध्ये एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. या वादाला निमित्त ठरलं आहे, दादर शिवाजीपार्क चौपाटीच्या सुशोभीकरणाच्या कामाचे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते २०१२मध्ये भूमिपूजन होऊन येथील चौपाटीवर धूप प्रतिबंधात्मक बंधारा बांधण्यास सुरुवात केली. त्यानंतर २०१४मध्ये चौपाटीच्या बंधाऱ्यावर सुशोभीकरणास सुरुवात होऊन ते पूर्णही झाले. मात्र, मनसेला या कामाचं श्रेय मिळू नये म्हणून मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने या बंधाऱ्यावरील सुशोभित पदपथाच्या वापरास महापौर बंगल्याच्या सुरक्षिततेचं कारण देऊन विरोध केला. तसेच, जागेला कुंपणही घातले, ज्यामुळे त्या पदपथावरून चालणे सुद्धा अशक्य झाले.

''शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांनी आज या कामाच्या सुशोभिकरणाच्या भूमिपूजनाचा घाट घालून ‘आयत्या बिळावर नागोबा’ ही आपली वृत्ती कायम असल्याचे दाखवून दिले आहे'', अशी टीका मनसेचे नेते आणि दादर-माहीमचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी केला आहे.  

दादर चौपाटीची होणारी धूप थांबावी व किनाऱ्याचे संवर्धन आणि सुशोभीकरण व्हावे या उद्देशाने २०१२ साली चौपाटीवर धूप प्रतिबंधात्मक बंधारा बांधण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड व नितीन सरदेसाई यांच्या अथक प्रयत्नानंतर सदर कामाला मान्यता मिळाली होती. तसेच, याचे राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन सुद्धा झाले आणि  २०१४ साली हा बंधारा बांधून पूर्ण झाला. त्यानंतर बंधाऱ्यावर सुशोभीकरण करण्यास सुरुवात केली. पण, मनसेला या कामाचं श्रेय मिळू नये म्हणून मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने महापौर बंगल्याला लागून असलेल्या पदपथाच्या वापरास विरोध केला आणि त्या जागेवर कुंपणच घालून ठेवले, ज्यामुळे त्या पदपथावरून चालणे सुद्धा अशक्य झाले, अशी माहिती नितीन सरदेसाई यांनी दिली.

२०१४ मध्ये शिवसेनेचे सदा सरवणकर दादर – माहीमचे आमदार म्हणून निवडून आले, खासदार म्हणूननही शिवसेनेचेच राहुल शेवाळे निवडून आले. पण मागील साडे चार वर्षात त्यांचे दादर चौपाटीकडे लक्ष नव्हते. अचानक आज दिनांक ६ मार्च २०१९ रोजी जो बंधारा २०१४ सालीच बांधून पूर्ण आहे, जिथे सुशोभित वॉक-वे आधीच तयार आहे, तिथे केवळ राजकीय लाभासाठी नव्याने भूमिपूजन केले, जात आहे, अशी टीकाही नितीन सरदेसाई यांनी केली आहे. 

“आता निवडणुका जवळ आल्यावर यांना दादर चौपाटीची आठवण आली. आम्ही केलेल्या कामाचे श्रेय दुसरा राजकीय पक्ष घेतोय याचं दुख नाही, पण मनसेला श्रेय मिळू नये म्हणून शिवसेनेने विनाकारण गेली ५ वर्षे ह्या बंधाऱ्यावरून चालण्यास लोकांना बंदी केली होती, हे मात्र निश्चितच दुर्दैवी आहे”, असे मत नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केले आहे. 

 

टॅग्स :नितीन सरदेसाईमनसेशिवसेना