Join us

बिहारी मतांसाठी शिवसेनेचा जोगवा

By admin | Updated: November 30, 2015 02:33 IST

कल्याण-डोंबिवलीप्रमाणेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीतही घवघवीत यश मिळावे म्हणून शिवसेनेने बिहारी मतांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंबर कसली आहे

मनोहर कुंभेजकर, मुंबईकल्याण-डोंबिवलीप्रमाणेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीतही घवघवीत यश मिळावे म्हणून शिवसेनेने बिहारी मतांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंबर कसली आहे. मराठी मतांवर एकहाती सत्ता आणण्यासाठी कसरत होऊ नये म्हणून बिहारी मते मिळविण्यासाठी शिवसेना याकामी लागली आहे.बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या शपथविधीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना लखनऊला धाडले होते. या वेळी त्यांनी श्रीगणेशाची चांदीची मूर्ती नितीशकुमार यांना भेट दिली. या भेटीकडे औपचारिकता म्हणून पाहिले जात असले तरी राजकीय विश्लेषकांच्या मते ही भेट म्हणजे नितीशकुमार यांच्याशी मैत्री वाढवून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी बिहारी मतांना आपल्याकडे खेचण्याची एक रणनीती आहे. महत्त्वाचे म्हणजे महापालिका निवडणुकीसाठी नितीशकुमारही शिवसेनेला मदत करू शकतात; आणि त्याच मनसुब्यासाठी ही भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणुकीत मतदारांनी शिवसेनेला केलेल्या २ लाखांहून अधिक मतांमुळे त्यांचे आभार मानण्यासाठी माजी नगरसेवक दिलीप शिंदे आणि पी(दक्षिण)विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षा प्रमिला शिंदे यांनी गोरेगावमध्ये मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बिहारी मतदारांचे जाहीर आभार मानले. या वेळी देसाई म्हणाले की, बिहारी जनतेला भडकावण्याचे काम काही पक्ष करीत आहेत. मात्र येथील जनतेने शिवसेनेला दिलेल्या दोन लाखांहून अधिक मतांमुळे आम्ही खूश आहोत. आगामी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवणुकीत शिवसेनेला यश मिळेल, अशी आशा आहे. या मेळाव्याला उत्तर भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.