Join us  

मुंबई मा जलेबी ने फाफड़ा, उद्धव ठाकरे आपडा; शिवसेनेची गुजराती बांधवांना घातली साद 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 3:38 PM

Mumbai Politics : मुंबई मा जलेबी ने फाफड़ा उद्धव ठाकरे आपडा अशी टॅग लाईन घेत आगामी पालिका निवडणुकीसाठी गुजराथी बांधवांना हेमराज शाह यांनी साद घातली आहे.

- मनोहर कुंभेजकर 

मुंबई : 2022 च्या आगामी पालिका निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि पर्यावरण व उपनगर पालक मंत्री आदित्य ठाकरे हे मुंबईतील शिवसेनेचे विभागप्रमुख,आमदार,नगरसेवकांशी संवाद साधत आहेत. आता मुंबईतील सुमारे 25 टक्के गुजराती  समाज बांधव शिवसेनेशी जोडण्यासाठी शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी कंबर कसली आहे.

मुंबई मा जलेबी ने फाफड़ा उद्धव ठाकरे आपडा अशी टॅग लाईन घेत आगामी पालिका निवडणुकीसाठी गुजराथी बांधवांना हेमराज शाह यांनी साद घातली आहे. मुंबई मधील गुजराती मतदारांना जागृत करण्यासाठी आज  सकाळी १० वाजतां नवनीत हॉल, गुजराती समाज भवन, लोटस पेट्रोल पंप समोर, ओशिवरा जोगेश्वरी लिंक रोड, जोगेश्वरी(पश्चिम) येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 

गरम फाफडा, जिलबी, सुरती पोक(कोवळा हुरडा), गुजराती कढी, वडा पाव, कांदा पॅटिस आणि त्याबरोबर गरम चहा,कॉफी सोबत बिस्कीट असा खास बेत होता. यावेळी उपस्थित सुमारे 100 गुजराती व्यापाऱ्यांनी व उपस्थितांनी या चविष्ट मेनूचा आस्वाद घेतला.

यावेळी प्रमुख आथिती म्हणून शिवसेनेच्या जेष्ठ नगरसेविका व गुजरात संपर्क प्रमुख राजुल पटेल,शिक्षण समिती अध्यक्ष संध्या विपुल दोशी, जेष्ठ नगरसेवक राजू पेडणेकर,तसेच राजेश दोशी,जयंतीभाई मोदी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी 11 गुजराती बांधवांनी हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहिर प्रवेश केला. यामध्ये व्यापारी तसेच तरुणांचा समावेश होता.

 हेमराज शाह आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले की, शिवसेना नेहमीच गुजराती बांधवांच्या मागे भक्कमपणे उभी राहिली असून दंगलीत सुद्धा शिवसेनेने आमचे रक्षण केले आहे. शिवसेनाप्रमुखांचा आम्हाला गर्व आहे. सर्व जाती धर्माचा आदर करणाऱ्या शिवसेनेने चंद्रिका केनिया,मुकेश पटेल,राजुल पटेल,संध्या दोशी आणि अन्य गुजराती बांधवांना राजकीय प्रतिनिधीत्व दिले आहे.तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या नोटा बंदी,जीएसटी यामुळे अनेक गुजराती बांधव त्रस्त असून त्यांचे उद्योगधंदे डबगाईला आले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शांत,संयमी असून राज्याचा गाढा उत्तमप्रकारे चालवत आहे. गुजराती बांधवांनी व व्यापारी वर्गाने आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे त्यांनी आवाहन केले.

राजुल पटेल म्हणाल्या की,एका गुजराती समाजातील सामान्य महिलेला शिवसेनेने मान सन्मान देत राजकारणात नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली. महाराष्ट्र  ही आपली आई आहे तर गुजराती ही मावशी आहे असे शिवसेनाप्रमुख आवर्जून  म्हणत असत असे सांगून त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी प्रभावी कामगिरी करत कोरोना  आटोक्यात आणला.त्यांनी राष्ट्रीय नेतृत्व करून देशाचे पंतप्रधानपद भूषवावे अशी भूमिका त्यांनी मांडली. बोरिवली व दहिसर मध्ये गुजराती बांधव मोठ्या संख्येने असतांना भाजपाने त्यांना 2014,2019 मध्ये आमदारकीचे साधे तिकीट दिले नसल्याची त्यांनी टिका केली. गुजरात राज्यात सुद्धा शिवसेना वाढवण्यासाठी आपल्या बांधवांनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.

शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोशी म्हणाल्या की,माझी ही नगरसेवक म्हणून तिसरी टर्म आहे. 2017 मध्ये मी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रभाग समिती अध्यक्ष आणि आता शिक्षण समिती अध्यक्षपद दिले. 

टॅग्स :शिवसेनामुंबईराजकारण